मुंबई, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनिधींवर हल्ले होणे गंभीर आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. तसेच आमदार सातव यांच्यावर हल्ला करणा-यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करा, अशी मागणी देखील पटोले यांनी केली आहे.
आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आज (दि.९) शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला. पटोले पुढे म्हणाले की, या सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदारच खुलेआम दादागिरी करत आहेत. हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते, गोळीबार केला जातो, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींची सुरक्षा काढून घेतल्या आहेत. लोकप्रतिनिधींना लोकांमध्ये जावे लागते, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, विविध कार्यक्रमांसाठी त्यांना जनतेमध्ये फिरावे लगते, पण असे हल्ले होत असतील तर लोकप्रतिनीधींनी काम कसे करायचे? पोलीस दल व इतर सरकारी यंत्रणा विरोधी पक्षांचे नेते व लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यासाठी राखीव आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.
दोन दिवसाआधी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौ-यात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. असे प्रकार वाढत असून गुन्हेगारांवर या सरकारचा वचकच राहिलेला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली असून केवळ सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा पुरविली जात आहे. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे, त्याचे जंगलराज करू नका. सातव यांच्या पाठीशी प्रदेश काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर पुन्हा हल्ला होणार नाहीत यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावी व सातव यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना आणि हल्ल्यामागील मास्टरमाईंडला तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा :