माझ्यावरील हल्ल्यामागे मोठी ताकद : आमदार प्रज्ञा सातव यांचा गंभीर आरोप | पुढारी

माझ्यावरील हल्ल्यामागे मोठी ताकद : आमदार प्रज्ञा सातव यांचा गंभीर आरोप

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : माझ्यावरील हल्ल्यामागे मोठी ताकद असू शकते, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे.  त्‍यांच्‍यावर  बुधवारी(दि.०८) रात्री हिंगोली येथे हल्ला झाला होता.

या घटनेबाबत  बोलताना प्रज्ञा सातव म्हणाल्या की, “माझ्यावरील हल्ल्यामागील कारण संशयास्पद आहे. हल्लेखोराशी माझे कोणतेही वैमनस्य नव्हते. त्याला मी ओळखतही नाही. त्याने माझ्यावर हल्ला करण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्यामुळे या हल्ल्यामागे एक मोठी शक्ती असू शकते. हल्लेखोराच्या पाठीमागे कोण आहे? हे समोर येईपर्यंत आमचे समाधान होऊ शकत नाही.”

आपण स्वत:हून हल्ला केला नाही. मला हल्‍ला कारायला कोणीतरी सांगितले,  अशी कबुली हल्‍लेखोराने पोलिस चौकशीत दिली आहे. त्‍यामुळे लवकरच हल्‍लेखोराच्‍या मागे कोण आहे, हे समोर येईल, असेही त्या म्हणाल्या.

यापूर्वी हिंगोलीत ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान पेडगाव येथे माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी आम्ही या प्रकारला गांभीर्याने घेतले नाही. काही महिन्यातच माझ्यावर हा दुसरा हल्ला झाला आहे. आता शांत बसणे योग्य होणार नाही, असे समजूनच आम्ही पोलिसांत तक्रार दिली असल्याचेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

हिंगोली जिल्ह्यात आम्ही पक्षाचं काम पूर्ण ताकदीने करत आहोत. गावागावात फिरुन नागरिकांशी संवाद साधत आहोत. नागरिकांचाही आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मला घाबरवून घरी बसवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. मात्र, घाबरून घरी बसणाऱ्यांमधील मी नाही. आम्ही असेच काम करत राहणार आहोत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

माझ्यावर हल्ला झाला या घटनेत पोलिसांची काहीही चूक नाही. माझ्यासोबत कायम एक महिला पोलिस असते.आरोपीने अंधाराचा फायदा घेऊन अचानक हल्ला केला. त्यात महिला पोलिसाची काहीही चूक नाही. हिंगोली पोलिस अधीक्षकांनी या हल्ल्यानंतर माझी सुरक्षा वाढवली आहे. सर्व दक्षता घेऊन यापुढील कार्यक्रम करत जावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत, असेही  प्रज्ञा सातव यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

Back to top button