चाकण : कोणता झेंडा घेऊ हाती..! शिवसेनाफुटीनंतर शिवसैनिकांची अवस्था | पुढारी

चाकण : कोणता झेंडा घेऊ हाती..! शिवसेनाफुटीनंतर शिवसैनिकांची अवस्था

चाकण; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिवसैनिकांमध्ये मोठी चलबिचल सुरू असल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहावयास मिळात आहे. खेड तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत अस्वस्थता असून, बहुतांश शिवसैनिक संभ्रमावस्थेत आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात काही शिवसैनिकांचे इनकमिंग झाले आहे. खेड तालुक्यात शिवसेना पक्षाला तत्कालीन आमदार सुरेश गोरे यांच्याकडे तालुक्याची धुरा आल्यानंतर मोठे बळ मिळाले. तालुक्यात शिवसेना पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समितीत सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष झाला. चाकण पालिका शिवसेनेच्या ताब्यात आली, अन्य पालिकांमध्येही पक्ष सरस झाला. दरम्यान, कोरोनाच्या काळात माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाल्यानंतर पक्षातील कथित निष्ठावंतांनी आपल्या वाटा वेगळ्या केल्या.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहून महाविकास आघाडीतील तालुक्यातील गळचेपी अनेक शिवसैनिकांना नकोशी झाली आहे. तालुक्यात खरा संघर्ष राष्ट्रवादीसोबत असताना कोणासोबत जायचे, याबाबत संभ्र म आहे. राष्ट्रवादीच्या त्रासाला कंटाळलेल्या शिवसेनेच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्यासोबत घेण्यात बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यशस्वी झाले आहेत.

खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय माजी आमदार गोरे कुटुंबीय यांच्या घरी येऊन भेट घेतल्यानंतर देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. मात्र, आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक पक्षांसमोर अडचणी उभ्या करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ’कोणता झेंडा घेऊ हाती..’ अशी अनेक कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे.

काही बडे कार्यकर्ते वगळता अद्याप मूळच्या शिवसेनेतील खूप मोठा लोकसंग्रह असलेले शिवसैनिक-पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या गळाला लागलेले नाहीत. स्वर्गीय आमदार गोरे कुटुंबीयांच्या भूमिकेकडे जवळपास सर्वच पक्षांचे तालुक्यातील प्रमुख लक्ष ठेवून आहेत. एकूणच, अचानक ओढवलेल्या राजकीय वादळामुळे आता खेड तालुक्याचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार, याबाबतही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या सेनेतील वरिष्ठ नेते हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फुटू नयेत, यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Back to top button