नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
पौषवारीमुळे ञ्यंबकनगरी हरिनामाने दुमदुमली आहे. काल सायंकाळपर्यंत 500 पेक्षा जास्त दिंडया शहरात दाखल झाल्या होत्या. यावर्षी प्रत्येक दिंडीत वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. युवकांचा सहभाग लक्षणीय आहे. दिंडया मुक्कामाच्या जागी थेट डोंगरावर पोहाचत आहेत.
ञ्यंबक नगरपालिका प्रत्येक दिंडीस पाण्याचा टँकर मागणीप्रमाणे पाठवत आहे. मात्र दिंडी थांबलेल्या ठिकाणावर जाण्यास रस्ता मिळणे दुरापास्त झाले आहे. दिंडयांची संख्या वाढल्याने एकापाठोपाठ एक दिंडी येत आहे. ञ्यंबकेश्वर मंदिरात जाण्यासाठी दिंडीतील रथांची रांग लागलेली होती. मंदिर प्रांगणात तर वैष्णवांचा मेळा अनुभवण्यास येत आहे. संत निवृत्तीनाथ मंदिरात दर्शनासाठी जाऊन मुक्कामाच्या ठिकाणावर पोहचण्याची लगबग सायंकाळ पर्यंत दिसून येत होती. व्यवसायिकांच्या दुतर्फा गर्दीतून वाट काढताना वारकऱ्यांची दमछाक होत आहे. नगर परिषदेने दुतर्फा व्यावसायिक गाळे आखले असून ठेकेदारीने ते 10 ते 60 हजारांना दिले आहेत. त्यामुळे रस्ते संकुचीत झाले आहेत.
पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
यावेळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा आज, पहाटे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक केली. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सूर्यवंशी दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान मिळाला.
नगरपालिका सभागृहात वॉररूम
ञ्यंबक नगरपालिका प्रशासनाने यावर्षी सभागृहात वॉररूम उभारला आहे. संपूर्ण शहरात 32 सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यांचे थेट प्रक्षेपण सभागृहात लावलेल्या पडद्यावर होत आहे. येथे बसलेले कर्मचारी नगरसेवक सर्व परेस्थितीवर नजर ठेवून आहेत. शहरात पब्लीक अनाउन्समेंट सिस्टीम बसविण्यात आली आहे. पडद्यावर जेथे गर्दी झालेली दिसते त्यांना तातडीने जाहीर सुचना दिली जाते.
स्वागताचे बॅनर हटविले
यात्रोत्सवात पुढारी स्वागताचे बॅनर लावत असतात. संत गजानन महाराज संस्थान पासून ते जुने बस स्थानकापर्यंत रस्त्याच्या मधोमध माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांचे जवळपास 100 बॅनर उभे करण्यात आले होते. मात्र आचारसंहितेमुळे नगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सर्व बॅनर उतरवून ट्रक्टरमध्ये टाकून घेऊन गेले.
हेही वाचा :