पुणे : रुग्ण कल्याण समितीला अखेर मुहूर्त ; महापालिकेच्या 22 दवाखान्यांमध्ये स्थापना | पुढारी

पुणे : रुग्ण कल्याण समितीला अखेर मुहूर्त ; महापालिकेच्या 22 दवाखान्यांमध्ये स्थापना

हिरा सरवदे : 

पुणे : शहरातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यास अखेर महापालिकेला मुहूर्त मिळाला आहे. शासन निर्णयानुसार महापालिकेच्या 53 पैकी 22 प्रसूतिगृह आणि दवाखान्यांमध्ये ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

नागरिकांना आरोग्यविषयक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर रुग्ण कल्याण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरातील महापालिका व नगरपालिकांच्या दवाखान्यांमध्ये रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने 2015 साली काढला आहे.

शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या 18 प्रसूतिगृहांमध्ये आणि 35 दवाखान्यात सात सदस्यीय रुग्ण कल्याण समिती स्थापन होणे अपेक्षित होते. मात्र, कोविड व इतर कारणांमुळे दवाखान्यांमध्ये ही समिती अस्तित्वात येऊ शकली नव्हती. कोविडचे संकट दूर झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण कल्याण समिती स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत महापालिकेच्या 18 पैकी 15 प्रसूतिगृहांमध्ये व 35 पैकी 7 दवाखान्यांमध्ये ही समिती स्थापन झाली आहे. ही समिती स्थापन झाल्यानंतर शासनाकडून प्रसूतिगृहांना दरवर्षी अडीच लाख रुपये आणि दवाखान्यांना 1 लाख 75 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

काय आहे समितीचे कार्य

दवाखान्यातील आरोग्य सेवांचा विकास करणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे, आरोग्य शिबिरांचे नियोजन करणे, शासकीय सेवा गरजा पाहून दिल्या जात आहेत का, याची खात्री करणे व लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे, देणगी स्वरूपात किंवा इतर प्रकारे आर्थिक भर घालणे, उपलब्ध निधीचा विकेंद्रित पद्धतीने वापर करणे.

या कामांसाठी निधीचा वापर
? गरीब रुग्णांसाठी औषध खरेदी, बाहेरील प्रयोगशाळेतील नमुने तपासणी खर्च, रुग्णालयांसाठी रुग्णालयीन कपडे, बाळ व बाळंतिणीस नवीन कपडे, इमारत व निवासस्थानांची किरकोळ दुरुस्ती, रुग्णांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करणे, रुग्णांसाठी बैठकव्यवस्था करणे, रुग्णांसाठी गरम पाण्याची व्यवस्था करणे, स्वयंपाकघर व धर्मशाळेची किरकोळ दुरुस्ती करणे, रुग्णांसाठी शौचालयाची व्यवस्था करणे, नावीन्यपूर्ण योजनांवर खर्च करणे.

 

शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्ण कल्याण समित्या स्थापन करण्यास कोविड परिस्थितीमुळे काहीसा विलंब लागला आहे. मात्र, आता या समित्या स्थापन केल्या जात आहेत. या समित्या स्थापन झाल्यानंतर रुग्णांना अनेक सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे सोपे होणार आहे.

                 -डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका

Back to top button