नगर; पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसीच्या अभियंत्यासह तत्कालीन उप अभियंत्याला एक कोटीची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल सायंकाळी रंगेहात पकडले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर गायकवाड (वय- 32, सहाय्यक अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभाग अहमदनगर), गणेश वाघ (तत्कालीन उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उपविभाग नगर, सध्या कार्यकारी अभियंता, धुळे, जि. धुळे) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, तक्रारदार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अहमदनगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये 1000 एमएम व्यासाची लोखंडी पाईपलाईन बदलण्याचे काम घेतले होते. त्याकामाच्या मंजूर निविदेनुसार 31,57,11,995 रुपयाचे रकमेचे 5 टक्के प्रमाणे अनामत रक्कम 1,57,85,995 रुपये आणि सदर कामाचे सुरुवातीची सुरक्षा ठेव रक्कम 94,71,500/- रुपये झालेल्या कामाचे अंतिम देयक 14,41,749/- रुपये असे एकूण 2,66,99,244/- रुपये तक्रारदार यांना मिळाणे आवश्यक होते.
त्यानुसार त्या बिलावर तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांचा मागील तारखेचे आऊट वर्ड करून त्यावर सह्या होणे गरजेचे होते. ही देयकावर वाघ यांच्या सह्या घेऊन सदर देयक त्यांच्याकडे पाठविण्याच्या मोबदल्यात सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांनी स्वतः साठी व गणेश वाघ यांच्याकरिता तक्रारदार यांच्याकडे कामाचे बिलाचे व यापूर्वी अदा केलेली काही बिलांची बक्षीस म्हणून एक कोटी रूपयांची मागणी २० ऑक्टोबर रोजी केली. तक्रारदारांनी ही तक्रार नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
त्या त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी शुक्रवारी ( दि. ३) शेंडी बाह्यवळण रस्त्यावर सापळा लावून सहाय्यक अभियंता गणेश वाघ याला एक कोटींची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही लाच अभियंता वाघ यांच्यासाठी स्वीकारल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने वाघ यांनाही ताब्यात घेतले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रभाकर गवळी,पोलिस नाईक संदीप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली.
हेही वाचा