प्लूटोवर बर्फाचा फवारा करणारा ज्वालामुखी | पुढारी

प्लूटोवर बर्फाचा फवारा करणारा ज्वालामुखी

वॉशिंग्टन : प्लूटोला एकेकाळी आपल्या ग्रहमालिकेत ‘ग्रह’ म्हणून स्थान होते. मात्र, नंतर खगोलशास्त्रज्ञांनी त्याला पूर्ण ग्रहाचा दर्जा देण्यास विरोध करून ‘खुजा ग्रह’ ठरवले. अर्थात तरीही प्लूटोबाबत सातत्याने नवे संशोधन होत असते. आता एका नव्या संशोधनानुसार प्लुटोवर बर्फ उत्सर्जित करणारा एक ‘सुपरव्होल्कॅनो’ आहे. अमेरिकेतील यलोस्टोनइतक्या आकाराचा हा बर्फाचा ज्वालामुखी असल्याचे संकेत मिळालेले आहेत.

या ज्वालामुखीला ‘किलाझे कॅल्डेरा’ असे नाव आहे. ‘नासा’च्या न्यू होरायझन्स मोहिमेत त्याची काही छायाचित्रे टिपण्यात आली होती व त्याला ‘विवर’ ठरवण्यात आले होते. आता संशोधकांनी ‘न्यू होरायझन्स’च्या डेटाचा नव्याने अभ्यास केला आहे. त्यानुसार हे केवळ ‘विवर’ नसून तो बर्फाचा ज्वालामुखी आहे. त्यामधून आतापर्यंत अनेक वेळा बर्फाचा उद्रेक झालेला आहे.

त्याच्यामधून हजारो किलोमीटरवर जाणारा ‘क्रायो-लाव्हा’ उत्सर्जित होतो. हा बर्फ इतका आहे की त्याच्यामुळे लॉस एंजिल्ससारखे एखादे शहरही आच्छादित होऊ शकेल. त्याच्या प्रत्येक उद्रेकातून इतका बर्फ बाहेर येतो. ‘क्रायोव्होल्कॅनो’ला ‘आईस व्होल्कॅनो’ असेही म्हटले जाते. अशा ज्वालामुखीमधून वितळलेल्या खडकांऐवजी बर्फ, पाणी व काही वायू बाहेर येत असतात.

Back to top button