नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा ; वृद्ध कलावंतांचे उर्वरित आयुष्य सुकर सुसह्य जावे यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करून त्यांच्या मानधनात वाढ करवून घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारने लागू केलेल्या पेन्शन योजनेतून वृद्धकलावंतांना 5000 रुपये इतके मानधन आता मिळत आहे. तेव्हा प्रत्येक गावातील वृद्ध कलावंतांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून याचा लाभ घ्यावा;असे आवाहन संसद रत्न खासदार डॉ. हिना गावित यांनी केले.
वनपट्ट्यातील गावांना अर्थसाह्य मिळवून देणे, केंद्रीय सहाय्य योजनेतून बचत गटातील महिलांना रोजगार मिळवून देणे यासारख्या विविध योजनांचा लाभ गावागावात पोहोचावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले असून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील याप्रसंगी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केले.
अक्कलकुवा तालुक्यातील बामनगाव येथे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या आणि भातीजी महाराज पंथाचे संत परमपूज्य गोविंद दास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भजनी मंडळांचा मेळावा पार पडला. त्याप्रसंगी संसद रत्न खासदार डॉ. हिना गावित बोलत होत्या. बामनगाव सारख्या आडरस्त्यावरील गावाला पार पडलेल्या या मेळाव्याला 25 हून अधिक गावातून आलेले सरपंच उपसरपंच आणि भजनी मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक करताना स्पष्ट केले की, "संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित आदिवासी महिलांच्या उत्थानासाठी विशेष कार्य करीत आहेत केंद्र सरकारकडून त्यांनी विविध योजना आणून आदिवासी गावांच्या विकासाला चालना दिली आहे. त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित हे देखील ज्या पद्धतीने विकासाला गतिमान करीत आहेत, ते सर्व पाहून मी माझी भूमिका बदलली आहे. काँग्रेस पक्षाचा असून सुद्धा मी आगामी लोकसभा निवडणुकीत संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित याच पुन्हा निवडून याव्यात यासाठी प्रयत्न करणार आहे"; असे प्रताप वसावे म्हणाले. उपस्थित पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भजनी मंडळ सदस्य आणि ग्रामस्थ यांच्यातून देखील तसलाच सूर उमटला.
आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भजनी मंडळांना आदिवासी विकास विभागा मार्फत मोफत साहित्य वाटपाचा लवकरच कार्यक्रम राबवला जाईल, असे घोषित केले. त्याचबरोबर बचत गटांना शेळी वाटप सुरू करून महिलांना आत्मनिर्भर बनवले जात असून एकाही गावातून स्थलांतर होऊ नये हा आपला प्रयत्न असल्याचे मंत्री डॉक्टर गावित यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावातील पाणी प्रश्न सोडवला जात आहे आणि जल मिशन सारख्या योजना प्रभावीपणे अमलात आणल्या जात आहेत, त्याचा प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभ घ्यावा असे आवाहन करताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालू असलेल्या कार्याची माहिती दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, संसद रत्न डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित, जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, भातीजी सांप्रदायाचे उपाचार्य परमपूज्य श्यामसिंग गुरुजी, परमपूज्य खुमान दास महाराज, परमपूज्य नरसिंग महाराज, पंचायत समिती सदस्य आरशी वसावे, अशोक राऊत, किशोर पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बंडू वळवी, दिशा समितीच्या बबीता नाईक, चिंतामण महाराज, धनसिंग महाराज आणि स्थानिक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
हेही वाचा :