पुढारी ऑनलाईन: ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (दि.०२) तीन रेल्वे गाड्याची धडक होऊन, भीषण अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत सुमारे २८८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक हजारांपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचे कारण समोर आले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी माहिती दिली. वैष्णव म्हणाले या भीषण अपघाताचे कारण कळाले आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल करण्यात आल्याने ही रेल्वे दुर्घटना (Odisha Train Accident) घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेनंतर पीएम मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा आज घटनास्थळी भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. अपघाताचे प्राथमिक कारण शोधून काढण्यात आले असून, त्याला जबाबदार असणाऱ्यांचीही ओळख पटली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात (Odisha Train Accident) झाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
ओडिशाच्या बालासोर येथील दुर्घटनेचे बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. रेल्वे रुळावर रेल्वे डब्यांचे साचलेले ढीग, तसेच रूळाची दुरुस्ती आदी कामे अजूनही सुरू आहेत. एकीकडे मलबा उपसण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे रूळ दुरुस्ती केली जात आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या अपघातातील मदतकार्यासाठी १००० पेक्षा जास्त मनुष्यबळ या कामात गुंतले आहे. ७ पेक्षा जास्त पोकलेन मशीन, २ अपघात मदत गाड्या, ३-४ रेल्वे आणि रोड क्रेन तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान या स्थळी मदत काम पाहण्यासाठी अपघातस्थळी उपस्थित आहेत.