पुणे : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या 'ओमिक्रॉन' विषाणूमुळे अजूनपर्यंत कोणाला रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे किंवा कोणी दगावल्याचा पुरावा मिळालेला नाही. म्हणून घाबरून जायचे नाही; पण, स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर प्रत्येकाने लस घेतलीच पाहिजे. 'ओमिक्रॉन'चा आपल्याकडे धोका कमी असला, तरी सावधगिरी बाळणे गरजेचे आहे,' असे मत 'आयसीएमआर'चे माजी संचालक व ज्येष्ठ साथरोग शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.
लशीचे महत्त्व सांगताना डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, 'बाहेरच्या देशात कोविडप्रतिबंधक लशीचा शोध लवकर लागला. त्यांनी ते अॅडव्हान्स बुकिंग केले. पहिल्यांदा लस दिली आणि नंतर डेल्टाची साथ सुरू झाली. सध्या ज्या लसी आहेत, त्या माणसाला संसर्ग झाल्यावर हॉस्पिटलमध्ये भरती होऊ न देणे व त्याचा मृत्यू होऊ न देणे यासाठी प्रभावी आहेत; परंतु या फर्स्ट जनरेशन व्हॅक्सिन आहेत. त्या गडबडीत तयार केलेल्या आहेत. या स्टरलायझिंग इम्युनिटी तयार करणार्या आहेत. म्हणजेच त्यांच्यामध्ये संसर्ग न होऊ देण्याची क्षमतानाही, तर संसर्ग झाल्यावर गुंतागुंत थांबवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.
नैसर्गिक प्रतिकारशक्ती प्रभावी
लस आणि नवीन प्रतिकारशक्ती यांचा जर आपण विचार केला, तर नैसर्गिक संसर्गाची प्रतिकारशक्ती लसींपेक्षा जास्त प्रभावी आणि जास्त दिवस टिकून असते. लसीकरणामुळे आपल्याकडे नवीन संसर्गाची संख्या कमी झाली आहे. लस संसर्ग कमी करू शकत नाही. सगळे म्हणतात की, कोरोना विषाणूने दरवेळेस आपल्याला काहीतरी वेगळे दाखवले; पण अजूनही वाटते की, भारतात फार थैमान माजवणार नाही, पण आपल्याला वाट पाहावी लागेल, असेही ते म्हणाले.
हा विषाणू जेव्हा स्वतःपासून अनेक विषाणू बनवतो तेव्हा त्याला एंझाईम्सची प्रजनन करण्याची यंत्रणा लागते, पण ती यंत्रणा सदोष आहे. तर त्यावेळी तो नवीन विषाणू तयार करतो, त्यावेळी त्यामध्ये म्युटेशन्स होतात. पण, प्रत्येक म्युटेशन हे त्या विषाणूसाठी फायदेशीर असेल असे नाही. वुहानच्या विषाणूवर जेव्हा आपण लसी बनवल्या तेव्हा त्या विषाणूपेक्षा ऑक्टोबर 2020 ला 20 नवीन म्युटेशन्स झाले होते. आता त्याला वर्ष होऊन गेले आहे. आता ती संख्या 50 च्या वर गेलेली आहे.
लाइटली घेऊ नका; कारण…
'ओमिक्रॉन'च्या स्पाईक प्रोटीनमध्ये 32 प्रकारची म्युटेशन्स झाली आहेत. या स्पाईक प्रोटीनचा वापर करून तो पेशीच्या आत जातो. स्पाईक प्रोटीनच जर बदलले, तर कोव्हॅक्सिन वगळता कोविशिल्ड ही लस जी त्यावर (स्पाईक प्रोटीन) आधारित आहे, ती काम करेल का याबद्दल अजून आपण साशंक आहोत. कारण, हे नवीनच व्हेरिएंट दिसलेले आहे.
तरुणांमध्ये आढळला संसर्ग–
त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडेल का हे देखील आपल्याला माहिती नाही, तसेच मृत्युमुखी पडण्याची शक्यता वाढेल का हे माहिती नाही. हा विषाणू दक्षिण आफि—केत तरुण वयाच्या व्यक्तींमध्ये दिसला. तेथे लशीचे कव्हरेज 26 टक्के आहे. 70 टक्के लोकांच्या शरीरात नैसर्गिक संसर्गाने तयार झालेल्या अँटीबॉडी आहेत.
दुसरा डोस टाळू नका कारण—
ज्यांनी एक डोस घेतला आणि एक दिवस कसा वाया घालवायचा हा विचार करत दुसरा डोस घेणे टाळत आहेत, तर तसे करू नका. लस घेतल्याने जीव वाचतो. संसर्ग होऊ द्यायचा नसेल तर मास्क आणि सुरक्षित अंतर याला पर्याय नाही. लस घेतली म्हणून कोविड सुसंगत वर्तणूक पाळायची नाही किंवा कोविड सुसंगत वर्तणूक पाळतो म्हणून लस नको, हे दोन्ही चुकीचे आहे.