ठाणे : पुढारी वृत्तसेवा – मुंब्य्रात ४०० मुलांचे धर्मांतर झाल्याचा आरोप युपी पोलिसांनी केल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती . मात्र हा आरोप खोटा असून मुंब्र्यात एकाही मुलाचे धर्मांतर झाले नसल्याचा खुलासा मुंब्रा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड हे आणखी आक्रमक झाले. हिंदू, मुंब्रा आणि महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या उत्तर प्रदेशाच्या गाझियाबाद पोलिसांनी माफी मागावी, याकरिता त्यांना कडक शब्दात पत्र पाठवावे, अशी लेखी मागणी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
राज्यात महाविकास आघाडी विधानसभेच्या २०० जागा जिंकतील, असा दावा करीत डॉ. आव्हाड यांनी राज्य सरकारवर राज्यात दंगली घडविण्याचा आरोप केला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राज्य पुरस्कृत दंगली घडत आहेत. म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात पहिल्यादा दंगल झाली. वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, तो हल्ला वारकऱ्यांवर नसून विठ्ठलावर आहे. मुंब्र्यातही धर्मांतराचा विषय काढून दंगल घडविण्याचा प्रयन्त सुरु आहे. हिंदू, मुस्लिम यांना बदनाम करताना मुंब्रा बदनाम पर्यायाने आव्हाड यांना बदनाम करण्याचा डाव आता उलटा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
फडणवीस आणि शिंदेमध्ये काय सुरू आहे ते अख्ख्या जगाला माहितेय
"सर्व्हे काय सांगतात मला माहीत नाही. पण महाराष्ट्रातील भागाभागत फिरणारा मी आहे. कोणताही सर्व्हे फेल आहे. विकास नाही, शेतकरी बाजूने नाही. महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे. आज अस्थितरता आहे. महाराष्ट्र पहिल्यांदाचच इतका अस्थिर दिसतोय. त्यामुळे जे सर्व्हे रिपोर्ट आम्ही केलेत त्यानुसार महाविकास आघाडीला २०० जागा मिळतील. फडणवीस आणि शिंदेंमध्ये काय सुरू आहे ते अख्ख्या जगाला माहितेय याबाबत मी कशाला बोलू? मला काय करायचं त्या दोघांमध्ये", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यायला हवे. त्यांचा पीए खंडणी मागतो, हे गंभीर असल्याचेही ते म्हणाले.