लोणावळा : पुढारी डिजिटल : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर एका केमिकल घेऊन जाणाऱ्या टॅंकरला लोणावळ्यातील कुणे गाव पुलावर अपघात होऊन भीषण आग लागल्याने तीन ते चार जणांचा मृत्यू झाला तर अंदाजे दोन ते तीन गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे. सदर टॅंकर हा पुण्याकडून मुंबईच्या दिशेने निघाला होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघात ग्रस्त टॅंकर एक ज्वलनशील केमिकल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना सकाळी साधारण 11.35 वाजण्याच्या सुमारास कुणेगाव पुलावर पालटला आणि त्याला भीषण आग लागली. या टॅंकर मध्ये तीन जण असल्याचे समजत असून त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवाय याचवेळी हा टॅंकर ज्या पुलावर पालटला त्या पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावरून तिघेजण एका दुचाकीवरून चालले होते. या टॅंकर मधील पेटते केमिकल त्यांच्या अंगावर पडल्याने ते जबर भाजले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला, तर एक स्त्री गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय पुलाखाली आणखी ही दोन ते तीन गाड्या उभ्या होत्या, त्यादेखील जळल्या आहे, मात्र त्यात सुदैवाने कोणीही नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर घटनेची माहिती मिळतात आयआरबी, लोणावळा नगरपरिषद, खोपोली नगरपरिषद, आयएनएस शिवाजी यांचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू केले. आयएनएस शिवाजीच्या अग्निशमन वाहनातून AFFF फोमचा फवारा करून साधारण 12.45 वाजण्याच्या सुमारास सदर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र दरम्यान या टॅंकर मध्ये दोन ते तीन वेळा स्फोट झाले. लोणावळा शहर पोलीस, खंडाळा घाट महामार्ग पोलीस यांनी मोठ्या परिश्रम घेत परिस्थिती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. हे सर्व सुरू असताना एक्सप्रेस हायवेवर दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती.
हे ही वाचा :