

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सरकार स्थापन होऊन आता एक वर्ष होत आहेत. या काळात तुमच्या मतदारसंघातील प्रकल्पांना, योजनांना मंजुऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे आता उठसुट मुंबईत चकरा मारणे बंद करा, भेटीसाठी येणे थांबवा. आपापल्या मतदारसंघात ठाण मांडून बसा, मंजुर प्रकल्पांची अंमलबजावणी करा, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार आणि खासदारांना सुनावले.
शिवसेना वर्धापन दिन आणि शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशीरा शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. त्याचवेळी आपल्या पक्षातील आमदार खासदारांचेही कान टोचले. मतदारसंघ सोडून वारंवार मुंबईच्या फेऱ्या मारणाऱ्या आमदार, खासदारांना तंबी देत मतदारसंघातील जनसंपर्क वाढविण्याच्या तसेच तळागाळातील नागरिकापर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या.
राज्यात अडीच वर्षे सर्व प्रकल्प थांबले होते. आपले युतीचे सरकार येताच सर्व स्पीड ब्रेकर दूर करत, प्रकल्प मार्गी लावले. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र मागे पडला, युती सरकार येताच पून्हा एक नंबरवर आणला. आम्ही कुठल्याही प्रकल्पात वाट्यासाठी वाटाघाटी करत नाही. प्रकल्पातून रोजगार किती निर्माण होऊ शकतो याकडे आमचा कल असतो. एकाच वर्षात इतके निर्णय घेतले की विरोधकांना पोटदुखी सुरू झालेली आहे. त्यासाठी राज्यभर बाळासाहेबांच्या नावाने आपला दवाखानाही सुरू केलाय, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी टिकेची झोड उठवली. 'आम्ही बोगस काम करत नाही, एकदा ते बटन दाबा, मग दुसऱ्याच्या सोबत जा…हे आपल्याला जमत नाही. कोरोना काळात दुसऱ्या देशात जरा काही झाले की इथे मास्क सक्ती चालू व्हायची. तेव्हाचे मुख्यमंत्री घरी बसायचे तरी देशातील टॉप ५ मध्ये त्यांचा नंबर यायचा. त्या काळात ते सगळे घरी बसले होते तेव्हाही मी रस्त्यावर उतरून काम करत होतो. यापुढेही सर्वांना भेटणार आहे. सगळ्यांच्या गळ्यातले पट्टे काढणार आहे. माझ्यामुळे अनेकांच्या गळ्याचे आणि पाटीचे पट्टे आता दूर झाले आहेत, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मी खिशात मुद्दाम दोन पेन ठेवतो, एक संपला तर स्वाक्षरीसाठी दुसरा तयार असावा, पूर्वीप्रमाणे सही घेण्यासाठी माझ्याकडे वेळ घ्यावा लागत नाही, अशी टोलेबाजी त्यांनी केली.
-हेही वाचा