

पालघर : पुढारी वृत्तसेवा: कोकण किनारपट्टीतील 720 किलोमीटर अंतरापैकी 120 किलोमीटर परिसराचा समावेश पालघर जिल्ह्यात आहे. या पार्श्वभूमीवर बिपरजॉयच्या भीतीने पालघर जिल्ह्यातील (Palghar News) सर्व समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळ परिसरात १५ जूनपर्यंत मनाई आदेश जारी केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.
भारतीय हवामान विभाग व भारतीय राष्ट्रीय समुद्र सूचना सेवा केंद्र यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार बिपरजॉय चक्रीवादळाचा लँडफॉल सौराष्ट्र आणि कच्छ या प्रदेशात होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील (Palghar News) समुद्र किनाऱ्यांवर भरतीच्या उंच लाटा व समुद्र खवळलेल्या अवस्थेत असल्याची शक्यता असल्यामुळे अशा वेळी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी जीवितहानी होऊ नये, म्हणून पर्यटक व नागरिक यांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी जाहीर केले आहे.
तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पालघर जिल्हयातील वसई तालुका वगळून उर्वरीत क्षेत्रातील सर्व समुद्रकिनारे तसेच पर्यटनस्थळांच्या १ कि. मी. परिसरात १३ ते १५ जून या कालावधीमध्ये पर्यटक व नागरिक यांना फिरण्यास मनाई आदेश लागू करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुध्द भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१ (बी) नुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी बोडके यांनी म्हटले आहे.
हेही वाचा