पुढारी ऑनलाईन डेस्क: गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर आज (दि.२८) अखेर नितीशकुमार नव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदी शपथपबद्ध झाले. बिहारमधील 'राजद'सह, काँग्रेस आणि अन्य डाव्या पक्षांशी कोडीमोड घेत त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. या निर्णयामुळे त्यांनी पुन्हा एकदा 'एनडीए' सोबत संसार थाटल्याचे स्पष्ट झाले आहे. (Nitish Kumar Swearing Ceremony)
बिहारचे नवे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून आज (दि.२८) शपथविधी पार पडला. तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारमध्ये इतर एकूण ८ नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आज बिहारमधील पाटणा येथे हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. (Nitish Kumar Swearing Ceremony)
बिहारचे नेतृत्त्व पुन्हा नितीशकुमार यांच्याकडे गेले तर ते नवव्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतील. गेल्या २३ वर्षात बिहारमध्ये पाचवेळा विधानसभा निवडणुका झाल्या असल्या तरी नितीशकुमार यांनी ८ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (Nitish Kumar Swearing Ceremony)
नितीशकुमार असे नेते आहेत; ज्यांनी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपसोबत काम केले आहे. नितीशकुमार २००० मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रातही जबाबदारी सांभाळली होती.
२००० मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली होती. त्यावेळी 'एनडीए'कडे केवळ १५१ आमदार होते. तर 'आरजेडी'कडे १५९ आमदारांचे संख्याबळ होते. नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण सात दिवसांच्या आत त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर २००५ मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.
२०१० विधानसभा निवडणुकीत 'आरजेडी'ला मोठा धक्का बसला. 'एनडीए'ला २०६ जागा मिळाल्या. तर 'आरजेडी'ला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. त्यावेळी 'जेडीयू'ने १४१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यातील ११५ जिंकले. २०१० मध्ये नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे सुशील मोदी उपमुख्यमंत्री बनले.
२०२० ची विधानसभा निवडणूक त्यांनी पुन्हा भाजपसोबत निवडणूक लढवली. या निवडणुकीत 'आरजेडी'चे नुकसान झाले. त्यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. पण काही दिवसांनंतर २०२२ मध्ये पुन्हा त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी भाजपची सोथ सोडत 'आरजेडी'ला जवळ केले आणि ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आता पुन्हा नितीशकुमार 'आरजेडी'ची साथ सोडत भाजपला जवळ करत आहेत.
७२ वर्षीय नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणातील ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात. २०१३ पासून त्यांचे 'एनडीए' ते 'यूपीए' ते महागठबंधन असे चारवेळा 'यू टर्न' झाले आहेत. आधी ते 'यूपीए'मध्ये होते. त्यानंतर त्यांनी 'एनडीए'ची कास धरली. त्यानंतर तेथून बाहेर पडत महागठबंधनमध्ये प्रवेश केला. आतासुद्धा इंडिया आघाडीच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला; पण आता तेच पुन्हा 'एनडीए'त परत जाण्याची शक्यता आहे.