New Parliament Building Inauguration: नवीन संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचा साक्षीदार बनेल- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र माेदी (संग्रहित छायाचित्र)
पंतप्रधान नरेंद्र माेदी (संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: नवीन संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचा साक्षीदार बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना व्यक्त केला. नव्या संसदेतले (New Parliament Building Inauguration) पंतप्रधानांचे हे पहिलेच भाषण असल्याने त्याकडे देशवासियांचे लक्ष लागले होते.

भारत ही लोकशाहीची जननी तर आहेच पण जागतिक लोकशाहीसाठी ती प्रेरक देखील आहे. संविधान हाच आमचा संकल्प आहे. लोकशाही हा आमचा विचार, संस्कार आणि परंपरा आहे. पंचायत भवनापासून ते संसद भवनापर्यंत (New Parliament Building Inauguration) येथील लोकांचा विकास हीच आमची प्रेरणा आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

आज जेव्हा नवीन संसदेच्या निर्मितीवर आपण गर्व करीत आहोत, तेव्हा गेल्या ९ वर्षात चार कोटी गरिबांसाठी घरे, ४ लाख किलोमीटर लांबीचे रस्ते आणि ११ कोटी शौचालयांची बांधणी या बाबींचा विचार करताना मला समाधान होत आहे. असे सांगून मोदी म्हणाले की, नवीन संसद ही देशाची गरज होती. आगामी काळात लोकसभा मतदार संघांच्या तसेच खासदारांच्या संख्येत वाढ होण्याच्या अनुषंगानेही विचार करणे आवश्यक होते. शिवाय मागील दोन दशकांपासून नवीन संसदेच्या उभारणीची (New Parliament Building Inauguration) मागणी होत होती.

नवीन संसद भवन उभारणीमुळे ६० हजार लोकांना रोजगार-पंतप्रधान नरेंद्र मोदी

कित्येक वर्षांच्या विदेशी शासनामुळे आपला गौरव हिरावून घेतला होता. त्या वसाहतवादी मानसिकतेला आता देशवासियांनी मागे टाकले आहे. आणखी २५ वर्षांनी देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे पुढील २५ वर्षाच्या काळात आपणास विकसित राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटावे लागणार आहे. नवीन संसद भवन उभारणीमुळे ६० हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. या श्रमिकांना समर्पित अशी डिजिटल गॅलरी बनविण्यात आली आहे. आज जेव्हा आपण लोकसभा व राज्यसभेकडे पाहतो, तेव्हा ३० हजारपेक्षा जास्त पंचायत इमारती बनल्या, याचे मला समाधान आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

देशाकडे आज नवीन जोश, उल्हास, दिशा आणि दृष्टी

नवीन संसद भवनात 'सेंगोल' ची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगत ते म्हणले, महान चोल साम्राज्य काळात सेंगोल हे कर्तव्य, सेवा आणि राष्ट्र पथाचे प्रतीक मानले जात असे. याठिकाणी खास तामिळनाडूहून अधिनाम आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. नवीन संसद विकसित भारताच्या संकल्पाची सिद्धी होताना पाहेल. नव्या रस्त्यावरून चालण्यानेच नवीन यश प्राप्त केले जाऊ शकते. आज भारत नवीन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ती गाठण्यासाठी वाटचाल करीत आहे. देशाकडे आज नवीन जोश, उल्हास, दिशा आणि दृष्टी आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी जे स्वप्न पाहिले होते, त्याची पूर्तता करण्याचे साधन नवीन संसद बनेल. आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचा साक्षीदार देखील ही संसद बनेल.

नवीन संसद भवन १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षेचे प्रतिबिंब

जेव्हा भारत पुढे जातो, तेव्हा जग पुढे जाते. देशाच्या विकासाच्या माध्यमातून जग सुद्धा पुढे जाईल, असा विश्वास पीएम मोदी यांनी व्यक्त केला आहे. नवीन संसदेचे उद्घाटन हा सुवर्णमयी क्षण आहे आणि त्यासाठी आपण देशवासियांना शुभेच्छा देतो. हे केवळ भवन आहे असे नाही तर ते १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षेचे प्रतिबिंब आहे. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. याठिकाणी होणारा प्रत्येक निर्णय हा देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आणि येणाऱ्या पिढ्यांना सशक्त करणारा आहे. संसदेचे प्रत्येक दार आणि येथील प्रत्येक कण-कण गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. 'देश प्रथम' हा दृष्टीकोन ठेवून आपणास यापुढची वाटचाल करावी लागणार आहे. त्यासाठी व्यवहारातून उदाहरण सादर करावे लागेल. स्वतःमध्ये सदैव सुधारणा कराव्या लागतील. नवे रस्ते स्वतः बनवावे लागतील. लोककल्याण हा आपला जीवनाचा मंत्र बनवावा लागेल. नव्या संसदेत जेव्हा ईमानदारीने जबाबदारी पार पाडली जाईल, तेव्हा देशालाही प्रेरणा मिळेल.

नवीन संसद भवन सर्व सुविधांनी युक्त

महात्मा गांधींनी स्वराज्याच्या संकल्पनेने प्रत्येक देशवासियाला जोडले होते. याच्याच परिणामी आपणास १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष हाही महत्त्वाचा टप्पा आहे. रालोआ सरकारची मागची ९ वर्षे ही गरिबांच्या कल्याणाची राहिलेली आहेत. या ९ वर्षांमध्ये हजारो अमृत सरोवरांची निर्मिती झाली आहे. नवीन संसद भवन सर्व सुविधांनी युक्त आहे. याठिकाणी सदनात थेट सूर्यप्रकाश येत आहे, हे आपण पाहत आहातच. जुन्या संसद भवनात काम करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. तंत्रज्ञानाचा वापर असो वा बसण्याची अपुरी व्यवस्था असो. त्याचमुळे नवीन संसद बनविणे आवश्यक ठरले होते, असे मोदी म्हणाले.

संसद इमारत बांधताना 'एक भारत, श्रेष्ठ भारत' संकल्पनेचा अवलंब

नवीन संसद भवनात पारंपरिकता तर आहेच पण यात कौशल्य, संस्कृतीही आहे. यात संविधानाचा स्वरही आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, लोकसभेचा अंतर्गत भाग राष्ट्रीय पक्षी मोरावर आधारित आहे. तर राज्यसभेचा अंतर्गत भाग राष्ट्रीय फूल कमळावर आधारित आहे. देशाच्या विविध भागात जी विविधता आहे, त्याचा समावेश या भवनाची निर्मिती करताना केला गेला आहे. भवन बांधताना राजस्थानमधील 'बलवा, प्रकारचे दगड वापरण्यात आले आहेत. भवन निर्मितीसाठीचे लाकूड महाराष्ट्रातून आणले गेले आहे, तर याठिकाणचा गालिचा उत्तर प्रदेशातील भदोईमधील कारागिरांनी आपल्या हातांनी विणलेला आहे. एकप्रकारे 'एक भारत, श्रेष्ठ भारत' संकल्पनेचा अवलंब यात झाला आहे. 'जो थांबतो, त्याचे भाग्यही थांबते' पण जो चालत राहतो, भाग्य देखील त्याच्या बरोबर चालते. हा दृष्टीकोन भारतवासियांनी पुढचे मार्गक्रमण केले पाहिजे.

जागतिक आव्हानांचे संधीमध्ये रूपांतरण करण्याची संसदेची क्षमता – ओम बिर्ला

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा पूर्ण देश साक्षीदार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी सांगितले. अंतर्गत आणि जागतिक आव्हानांचे संधीमध्ये रूपांतरण करण्याची संसदेची क्षमता असल्याचे सांगत ते म्हणाले की, लोकशाही हा आपल्या मजबूत भविष्याचा आधार आहे. विविधतेमधील एकता ही आपली ताकत आहे. नव्या संसदेतील नवीन वातावरण निश्चितपणे नव्या विचारांना जन्म देईल. संसदीय प्रणालीमध्ये आपणास चांगल्या सिद्धांतांना पुढे न्यावे लागेल.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news