

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला काँग्रेससह २१ पक्षांनी विरोध केला होता. उद्घाटनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी "पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजतात," अशी टीका केली आहे.
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभानंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी लिहिले, "संसद ही जनतेचा आवाज आहे! संसद भवनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान राज्याभिषेक मानत आहेत." नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींनी करावे, असे म्हणत काँग्रेसने उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला होता. राहुल गांधींनीही याच्या समर्थनार्थ आवाज उठवला होता.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत त्यांना हुकूमशहा म्हटले आहे. रमेश यांनी उद्घाटनासाठी 28 मे ही तारीख निवडीवरही हल्लाबोल केला आणि या तारखेचा इतिहासही स्पष्ट केला.
जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये लिहिले की, भारतातील संसदीय लोकशाही मजबूत करणारे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अंतिम संस्कार याच तारखेला 1964 मध्ये करण्यात आले. त्यांनी असेही लिहिले की, ज्यांच्या विचारधारेमुळे महात्मा गांधींच्या हत्येचे वातावरण निर्माण झाले, अशा सावरकरांचा जन्म १८८३ मध्ये याच तारखेला झाला.
रमेश यांनी पुढे लिहिले की, राष्ट्रपती या पदावर बसणाऱ्या पहिल्या आदिवासी आहेत, त्यांना त्यांचे घटनात्मक कर्तव्य बजावू दिले जात नाही. त्यांना नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याची परवानगी दिली नाही. संसदीय कार्यपद्धतींचा तिरस्कार करणारा हुकूमशाही पंतप्रधान नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :