New Parliament Building Inauguration: धार्मिक पुजाविधीने संसदेच्या नवीन वास्तूचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता | पुढारी

New Parliament Building Inauguration: धार्मिक पुजाविधीने संसदेच्या नवीन वास्तूचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२८) संसदेची नवीन वास्तू समर्पित केली. सकाळपासूनच दोन सत्रामध्ये सुरू झालेल्या या सोहळ्यात देशभरातून आलेले अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. सोहळ्यासाठी खास तामिळनाडूतून आलेले अधीनम संतांनी विधीवत पुजा-अर्चनेच्या धार्मिक अनुष्ठानाने पंतप्रधानांनी संसदेच्या भव्य वास्तूचे उद्घाटन केले. याप्रसंगी खास राजदंड ‘सेंगोल’ची लोकसभा अध्यक्षच्या आसनाशेजारी प्रतिष्ठापणा केली. विशेष म्हणजे संसद वास्तूचे बांधकाम करणाऱ्या मजुरांचा सन्मान करीत पंतप्रधानांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सकाळी सव्वा सातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी कुर्ता आणि धोतर अशी पारंपरिक वेषभूषा करीत धार्मिक अनुष्ठाणासाठी सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाले.लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी त्यांचे स्वागत केले. संसद परिसरात दाखल होताच, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली अर्पित केली.

तामिळनाडूतील अधीनम संतांनी केलेल्या पूजाविधीत पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष बसले होते. पूजा दरम्यान पंतप्रधान ध्यानस्थ बसल्याचे दिसून आले. पुजेनंतर संतांनी मोदींना विधीवत सेंगोल सुपूर्द केले. साडे आठच्या सुमारास हा सेंगोल पंतप्रधानांकडून लोकसभेत स्थापित करण्यात आला. राजदंड स्थापित केल्यानंतर पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांनी त्यावर पुष्प अर्पण करीत नवीन संसदेचे उद्घाटन केले. सेंगोल स्थापित केल्यानंतर पंतप्रधानांनी विविध अधीनम संतांचे आशिर्वाद घेतले.

संसदेच्या उद्घाटनानंतर परिसरात सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. विविध गणमान्य व्यक्तींसह केंद्रीय मंत्रिमंडळ यावेळी उपस्थित होते. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख आणि इसाई धर्मासह २० धर्म गुरूंनी या प्रार्थना सभेतून देशाच्या प्रगतीची प्रार्थना केली.
तामिळनाडून आलेल्या संतांचा आशिर्वाद घेतांना पंतप्रधान म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तामिळनाडूची भूमिका महत्वाची राहीली आहे. पंरतु, दुर्भाग्याने देशाच्या स्वातंत्रासाठी तामिळ नागरिकांचे योगदानाला महत्व देण्यात आले नाही. आता भाजप या अनुषंगाने प्रयत्न करीत आहे. ‘सेंगोल’ असलेल्या हातात देशाची जबाबदारी असून, ते त्यांच्या कर्तव्यपालनापासून कधीही विचलित होणार नाही, याचे प्रतिक हे राजदंड असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

सोहळ्यानिमित्त लुटियन्स दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांना सोहळ्यासाठी तैनात करण्यात आले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहणी केली जात होते. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी संसदेसमोर विरोध सभा आयोजित करण्याचा इशारा दिल्याने पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कुस्तीपटूंनी आयोजित केलेल्या ‘महिला महापंचायत’ची परवानगी पोलिसांनी नाकारली होती.

हेही वाचा:

Back to top button