पुढारी ऑनलाईन डेस्क : सदृढ आरोग्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि अन्न याइतकीच महत्त्वाची गरज ही झोप आहे. आजवरच्या अनेक संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे. झोपेची कमतरता हे आजच्या धावपळीच्या जगण्यात अनेक आजारांचे निमंत्रण देत आहे. अपुर्या झोपेचा आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. जाणून घेवूया स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक व प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट डॉ. अँड्र्यू ह्युबरमन ( Neuroscientist Dr. Huberman ) यांनी आपल्या 'यूट्यूब चॅनेलवर सांगितलेल्या त्यांच्या दिनचर्येविषयी तसेच झोप आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध याबाबत न्यूरोसायंटिस्ट मॅथ्यू वॉकर यांचे मत…
आपल्या जगण्यात काही सवयी अंगवळणी पडल्या आहेत. आपण आपल्या दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने करतो. मात्र ही दिवसाची आरोग्यदायी सुरुवात नाही. ( Neuroscientist ) डॉ. ह्युबरमन म्हणतात की, "मी आपला दिवस लवकर सुरू करण्यास प्राधान्य देतो. दररोज सकाळी साडेसहा वाजता माझ्या दिवसाची सुरुवात होते. सकाळची सूरुवात चहा किंवा कॉफीने न करता मॉर्निंग वॉक करणे ही एक आरोग्यदायी असते. मी सकाळी जागे झाल्यानंतर पहिले काम हे १५ ते २० मिनिटे चालण्याचे करतो. कारण सकाळी तुमच्या शरीरावर पडणाऱ्या सूर्यकिरण हे तुमच्या रात्रीच्या शांत झोप लागण्याची पायरी ठरते."
ह्युबरमन सांगतात, १५ ते २० मिनिटे चालण्याचा व्यायाम केल्यानंतर ते एक ग्लास पाणी थोडे मीठ टाकून घेतात. यानंतर दिवसाचे पहिले जेवण सकाळी ११ वाजता घेतात. या दिनचर्येमुळे त्यांची साखर नियंत्रणात राहते त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य आणि मेंदूचे कार्य सुधारते असे स्पष्ट करत सदृढ शरीरासाठी आठवड्यातून किमान पाच वेळा शारीरिक कसरती (वर्कआउट्स) करण्याची शिफारसही ते करतात.
न्यूरोसायंटिस्ट मॅथ्यू वॉकर यांच्या मते, आधुनिक जीवनशैलीत बहुसंख्य प्राणघातक रोग, लठ्ठपणा आणि नैराश्यातून जीवन संपवणे याचा झोपेशी एक समान संबंध आहे. झोप ही आपल्या शरीरासाठी गाढ विश्रांती असते. ती एक २४ तासांच्या जगण्याच्या चक्रामधील महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही तुमच्या झोपेच्या चक्राकडे दुर्लक्ष केले तर तुमची शारीरिक व मानसिक क्षमता कमी करते. त्यामुळेच निरोगी आरोग्यासाठी नियमित झोप आणि त्यामध्ये सातत्य ठेवणे महत्त्वाचे ठरते.
न्यूरोसायंटिस्ट मॅथ्यू वॉकर यांच्या मते , "२१ व्या शतकात झोपेची कमतरता हे सार्वजनिक आरोग्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. झोपेची कमतरता हे लोकांना आजारी तर बनवतेच पण त्यांचे मनही बिघडवते. रात्रीची ७ ते ८ तासांची झोप ही आपली एकाग्रता सुधारतेच त्याचबरोबर स्मरणशक्ती सुधारण्यासही मदत करू शकते. तसेच टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यताही कमी होते. रात्रीची गाढ झोप अल्झायमर रोग, ऑस्टिओपोरोसिस आणि कर्करोगाचा धोका देखील कमी करू शकते."
हेही वाचा :