नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. संसद भवनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अन्य दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू उमेदवार आहेत.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल गुरुवारी सदिच्छा भेट घेतली होती. विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. २९ जून हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
आदिवासी नेत्या अशी ओळख असलेल्या मुर्मू मूळच्या ओडिशाच्या आहेत. त्यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. 'मुर्मू यांच्या उमेदवारीचे समाजातील सर्व घटकांनी स्वागत केलेले आहे. तळागाळातील समस्यांची जाण आणि भारताच्या विकासासाठीचे त्यांचे व्हिजन वाखाणण्यासारखे आहे,' असे ट्विट मोदी यांनी भेटीनंतर केले होते.
द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर करून एनडीएने केलेले बेरजेचे राजकारण महत्त्वाचे ठरले आहे. मुर्मू या आदिवासी समाजातील असून त्यांनी सहा वर्षे झारखंडचे राज्यपालपद सांभाळले आहे. ओडिशा विधानसभेतही त्या निवडून आल्या होत्या आणि भाजप आणि बीजू जनता दलाच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही सांभाळले आहे. राजकीय तसेच संविधानिक पदाचा अनुभव असलेल्या आदिवासी समाजातील महिलेची राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून निवड करण्यातून भारतीय जनता पक्षाने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग पुन्हा एकदा केला आहे.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. वडील बिरंची नारायण टुडू हे संथाल आदीवासी जमातीचे तालुका प्रमुख होते. त्यांचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्य होती. पण काही वर्षांनी दोन्ही मुले व पती यांचा मृत्यू झाला. पतीच्या व मुलांच्या निधनानंतर घराची संपूर्ण जबाबदारी द्रौपदी मुर्मू यांच्यावर पडली. त्यांनी घर सांभाळण्यासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी शिक्षकेची नोकरी पत्करली. त्यानंतर त्यांनी ओडिशा पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक(लिपीक) पदाची नोकरी केली. नोकरीच्या पैशातून घरखर्च आणि मुलीचे शिक्षण पूर्ण झाले.