

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पक्षाने (भाजप) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.
तत्पूर्वी, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संसदीय मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.
दुसरीकडे विरोधी पक्षांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून सिन्हा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. २९ जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए संख्याबळाच्या आधारावर भक्कम स्थितीत असून, बीजेडी किंवा आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेससारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित होईल, हे लक्षात घेण्यासारखे आहे.