Nashik : ओझर पोलिस ठाण्यातील लाचखोर पोलिस जाळ्यात

file photo
file photo

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा
धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच घेणार्‍या ओझर पोलिस ठाण्यातील अंमलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. कारभारी भिला यादव (52, रा. नरहरी नगर, पाथर्डी फाटा) असे या संशयित लाचखोराचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार 50 वर्षीय तक्रारदाराविरोधात धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने पकड वॉरंट काढले आहे. त्यानुसार ओझर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार कारभारी यादव यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी तसेच पकड वॉरंटमध्ये जामीनदार यांचे कागदपत्रे घेऊन सहकार्य करण्याचे आमिष दाखवले. त्या मोबदल्यात यादव यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याची तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यानुसार पंचवटीतील सीता गुंफा परिसरात रविवारी (दि.12) यादव यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली.

त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यादव यांना रंगेहाथ पकडले. यादव विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक साधना इंगळे, अंमलदार सचिन गोसावी, नितीन कराड, प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने हा सापळा रचला होता.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news