आषाढी वारी : बंदोबस्तासाठी 4500 अधिकारी-कर्मचारी येणार | पुढारी

आषाढी वारी : बंदोबस्तासाठी 4500 अधिकारी-कर्मचारी येणार

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत व वारकर्‍यांचा कैवारी पंढरपूरचा श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीच्या बंदोबस्ताची सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. दोन वर्षे न झालेल्या आषाढी वारीसाठी यंदाच्यावर्षी रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याचा अंदाज घेत सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून वारी बंदोबस्तासाठी बाहेरून सुमारे 4500 अधिकारी व कर्मचार्‍यांची मागणी करण्यात आली आहे. यंदाच्यावर्षी आषाढी वारीसाठी सर्वप्रकारच्या बंदोबस्तासाठी सुमारे 10 हजार कर्मचारी तैनात राहणार आहेत.

यंदाच्यावर्षी आषाढी वारी ही 10 जुलै रोजी साजरी होणार आहे. यंदाच्यावर्षी वर्षभरातील सर्वात मोठी वारी असलेल्या आषाढी वारीसाठी सर्व संतांच्या पालख्या असंख्य वारकर्‍यांसह पंढरपुरात येणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठलाची एकही वारी भरली नव्हती. केवळ प्रातिनिधिक स्वरूपात वारी साजरी झाली होती. त्यामुळे वारकर्‍यांमध्ये काही नाराजी पसरली होती. परंतु, यंदाच्यावर्षी कोरोनाची रूग्णसंख्याही खूप कमी झाल्याने सरकारनेही सर्व प्रकारचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आता वारकर्‍यांना पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली असल्यामुळे यंदाच्यावर्षी आषाढीसाठी लाखो वारकरी पंढरीत दाखल होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे वारी ही पूर्वीप्रमाणेच उत्साही व धार्मिक वातावरणात साजरी व्हावी म्हणून प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासनाने विविध विभागांच्या आतापर्यंत अनेक बैठका घेऊन पंढरपुरातील स्वच्छता, वारकरी निवास, 65 एकर मुक्‍काम तळ, पालखी मार्गावरील सुविधा, पोलिस बंदोबस्त याच्या तयारीला सुरुवात केली आहे. आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील एक अप्पर पोलिस अधीक्षक, 9 पोलिस उपअधीक्षक, 27 पोलिस निरीक्षक, 53 सहायक पोलिस निरीक्षक, 70 पोलिस उपनिरीक्षक, 2 हजार पोलिस कर्मचारी, होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, क्युआरटी असा सुमारे 5 हजार कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.

त्याशिवाय बाहेरून 5 अप्पर पोलिस अधीक्षक, 20 पोलिस उपअधीक्षक, 60 पोलिस निरीक्षक, 200 पोलिस उपनिरीक्षक आणि 4000 पोलिस कर्मचार्‍यांची बंदोबस्तासाठी मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय ग्रामसुरक्षा दल, पोलिस मित्र, एनसीसीचे विद्यार्थी यांचीदेखील पोलिस बंदोबस्तासाठी मदत घेणार आहेत. बंदोबस्तासाठी येणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांना योग्य त्या सोयीसुविधा पुरविण्यात येणार असून त्यासाठी ग्रामीण पोलिस दल कार्यशील आहे.

गर्दी न होण्यासाठी उपाययोजनांची जय्यत तयारी

पोलिस प्रशासनाकडून चंद्रभागा वाळवंट, नामदेव पायरी, प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, आजूबाजूचा परिसर यांचे नकाशे काढून गर्दी होणारे मार्ग यांची वारंवार पाहणी करून त्याठिकाणी गर्दी न होण्यासाठी काय करता येईल, याचे नियोजन केले आहे.

Back to top button