प्रसारण हक्क विक्रीत कोटीच्या कोटी उड्डाणे

प्रसारण हक्क विक्रीत कोटीच्या कोटी उड्डाणे

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमिअर लीगच्या 2023 ते 2027 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रसारण हक्कांचा लिलाव रविवारी आयोजित केला होता आणि हा ई-लिलाव सुरू आहे. यामध्ये डिजने स्टार स्पोर्टस्, सोनी नेटवर्क आणि रिलायन्स व्हायोकॉम 18 यांच्यात खरी टक्कर सुरू आहे, तर झी ग्रुप डिजिटल राईट्ससाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. अ‍ॅमेझॉन आणि गुगल यांनी या लिलाव प्रक्रियेतून माघार घेतल्याने आता रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यासमोर तगडे प्रतिस्पर्धी उरलेले नाहीत.

रविवारी सकाळी 11 वाजता या लिलावाला सुरुवात झाली आणि दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पॅकेज 'ए' व 'बी'साठी 42 हजार कोटींपर्यंत बोली लावली गेली. त्यानुसार प्रतिसामना 100 कोटी रुपये मोजण्याची तयारी स्पर्धकांनी दर्शविली आहे.

आयपीएलच्या डिजिटल राईटचे मूल्य 19 हजार कोटी, तर लाईव्ह ब्रॉडकास्टचे मूल्य 24 हजार कोटी लावले गेले आहे. त्यामुळे हा आकडा हळूहळू 43 हजार कोटींवर पोहोचला आहे. मागच्या लिलावात 'स्टार'ने प्रतिसामना 54.5 कोटी रुपये मोजले होते; परंतु त्याची किंमत आता 100 कोटींवर पोहोचली आहे. हा लिलाव सोमवारी सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहे.

लिलावाचा पूर्वार्ध

2008 साली जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली, तेव्हा क्लोजिंग बीडद्वारे (गुप्त बोली) पहिल्या दहा वर्षांसाठी या स्पर्धेचे टीव्ही प्रसारणासाठीचे हक्क सोनी कंपनीने 8200 कोटींना विकत घेतले होते. त्यानंतर 2017 ला स्टार स्पोर्टस्ने 16,347 कोटींची बोली लावत टीव्ही आणि डिजिटलचे प्रसारण हक्क स्वत:च्या ताब्यात घेतले. क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली होती.

2008 ते 2017
सोनी इंडिया : 8200 कोटी
2018 ते 2022
स्टार स्पोर्टस् : 16,347 कोटी

बीसीसीआयची चार विशेष पॅकेज कोणकोणती?

यावेळी प्रसारण हक्काचे वर्गीकरण बीसीसीआयने चार गटांमध्ये केलेले आहे. ज्यात प्रत्येक सत्रातील 74 सामन्यांचा समावेश असेल. मात्र, हे सामने प्रसारित करण्याची माध्यम वेगवेगळी असतील. शिवाय 2026 आणि 2027 च्या सत्रासाठी बीसीसीआय आयपीएल सामन्यांची संख्या 94 पर्यंत नेण्याच्या विचारात आहे.

पॅकेज 'ए' : भारतीय उपखंडासाठी टीव्ही प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी 49 कोटी

पॅकेज 'बी' : भारतीय उपखंडासाठी डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी 33 कोटी

पॅकेज 'सी' : प्रत्येक सत्रात 18 निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी 11 कोटी

पॅकेज 'डी': भारतीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी 3 कोटी

फुटबॉलमध्ये सर्वाधिक बोली

सध्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील एका सामन्यासाठी प्रक्षेपकाला सुमारे 17 दशलक्ष डॉलर मोजावे लागतात. कोणत्याही क्रीडा स्पर्धेतील एका सामन्यासाठी मिळणारा हा सर्वोच्च खर्च आहे. त्यापाठोपाठ इंग्लिश प्रीमिअर लीगमधील एका सामन्यासाठी 11 दशलक्ष डॉलर्स आणि मेजर लीग बेसबॉल स्पर्धेतील सामन्यासाठीदेखील अंदाजे इतकाच खर्च होतो. सध्याच्या किमान आधारभूत किमतीनुसार, बीसीसीआयला प्रत्येक आयपीएल सामन्यासाठी 12 दशलक्ष डॉलर मिळतील. जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटने घेतलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी झेप ठरेल. म्हणजेच एनएफएलनंतर आयपीएलचा क्रमांक लागेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news