नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय असलेल्या तक्रारदाराचे फिरते चित्रीकरणाचे वाहन जीएसटी भरारी पथकाने दंड न करता सोडून दिले होते. या मोबदल्यात संशयित लाचखोर राज्यकर अधिकारी जगदीश सुधाकर पाटील (३९,रा. कर्मयोगीनगर) यांना तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांनी जीएसटीच्या अधिकाऱ्यांकडून लाच मागितल्याची तक्रार दिली होती. तक्रारादाराचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. जाहिरात चित्रीकरणाच्या कामात व्यत्यय येऊन तक्रारदार यांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी चित्रीकरणासाठी आलेले वाहन जीएसटी दंड न भरता जीएसटी भरारी पथकाचे प्रमुख संशयित जगदीश पाटील यांनी काही दिवसांपुर्वी सोडून दिले होते. त्या मोबदल्यात पाटील यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधीक्षक शर्मीष्ठा वालावलकर यांच्या आदेशानुसार सापळा रचला. पोलीस निरिक्षक स्वप्निल राजपूत, नाईक प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, प्रकाश महाजन यांच्या पथकाने वस्तु व सेवा कर कार्यालयाच्या आवारात सापळा रचला.
यावेळी संशयित पाटील याने सोमवारी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारली असता त्यास रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरूद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :