नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पूर्वी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सहा ते सात जणांच्या टाेळक्याने एका फिर्यादीवर प्राणघातक हल्ला करुन गाेळीबार केल्याची घटना शनिवारी, दि.11 रोजी रात्री फुलेनगर येथे घडली. या हल्ल्यात फिर्यादीची आई व त्यांचा पाळीव कुत्रा जखमी झाला आहे. घटनेनंतर टाेळके पसार झाले असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
विशाल चंद्रकांत भालेराव (रा. मुंजाबाबा गल्ली), संदीप अहिरे, जय खरात, विकी वाघ व त्यांचे तीन साथीदार अशी संशयित हल्लेखाेरांची नावे आहेत. त्यापैकी विशाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचे दाेन तर प्राणघातक हल्ल्याचा एक असे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. या घटनेत उषा दयानंद महाले (वय 35, रा. मुंजाबाबा गल्ली, फुलेनगर) यांना गावठी कट्ट्यातून झाडलेली गाेळी चाटून गेल्याने त्या जखमी झाल्या आहेत. (दि. ११) रात्री नऊ वाजेच्या सुमारास परिसरातील प्रेम दयानंद महाले (वय 21) हा मित्र युवराज भोळके याच्यासह उभा असताना संशयित विशाल, संदीप, जय खरात हे हातात कोयते घेऊन आले. त्यांच्यासोबत असलेल्या विकी वाघ याचे हातात गावठी कट्टा हाेता. त्याचवेळी विशालने कारण नसतांना प्रेम याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने काेयत्याने हल्ला चढविला. प्रेमने हा हल्ला चुकवून जीव वाचविण्यासाठी घाबरून घराच्या दिशेने पळ काढला. तेव्हा संदीपने रस्त्यावर पडलेली विट प्रेमच्या दिशेने फेकून त्याच्या पायाला दुखापत केली. त्याचवेळी विकीने गावठी कट्ट्यातून प्रेमच्या घराच्या दिशेने गोळ्या झाडल्या. या गाेळीबारात प्रेमची आई उषा यांच्या उजव्या छातीजवळून एक गोळी चाटुन गेली. तर, त्याची मावशी जया चोथे यांचा पाळीव कुत्रा टॉमी याचे पायाला देखील गोळी लागली. यानंतर संशयितांनी निघुन जात असतांना गल्लीतील इतर लोकांना व महिलांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त डॉ किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डाॅ. सीताराम काेल्हे, पाेलिस निरीक्षक रणजित नलावडे, आंचल मुद्गल दाखल झाले. त्यांनी हल्लेखाेरांच्या शाेधार्थ टीम रवाना केल्या आहेत.
प्रत्युत्तर देण्यासाठी गाेळीबार
फिर्यादी प्रेम व त्याचा साथीदार राेहित गांगुर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी संशयित विशाल भालेराव याच्या नातलगांच्या घरावर सशस्त्र हल्ला चढविला हाेता. त्याच हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा गाेळीबार झाल्याचे कळते. काही दिवसांपूर्वीच दिंडाेरी नाक्यावर एका सराईताची हत्या झालेली असताना पुन्हा गाेळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.