Nashik Shirdi Accident : एकेरी वाहतुकीमुळे 10 निष्पापांना गमवावा लागला जीव

नाशिक अपघात,www.pudhari.news
नाशिक अपघात,www.pudhari.news
Published on
Updated on

सिन्नर : संदीप भोर
सिन्नर-शिर्डी मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. किरकोळ कामे वगळता जवळपास हा मार्ग वाहनांसाठी खुला झाला आहे. काही किरकोळ कामांसाठी ठेकेदार कंपनीकडून वन-वे केला जातो. मात्र आवश्यक त्या प्रमाणात, आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावलेले नाहीत. त्यामुळेच या भीषण अपघातात 10 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप पाथरेसह परिसरातील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

अपघात झालेल्या या मार्गावर आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (दि.12) सायंकाळी 5.30 च्या सुमारास वन वे केल्यानंतर  कामगार सुटी घेऊन निघून गेले. या ठिकाणी केवळ डंपरच्या सहाय्याने एक मातीचा गंज टाकण्यात आणि दोन पत्रे उभे करण्यात आले होते. त्यावर एक साधा बाणा दाखवून डायव्हर्जन करण्यात आले होते. ठेकेदार कंपनीच्या या निष्काळजी क्लृप्तीने भीषण अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

या भागात पालखी मार्गाकडे जाणार्‍या एका पुलाच्या पुढे पेव्हरब्लॉक टाकायचे होते. त्यासाठी गुरुवारी हे डायव्हर्जन करण्यात आल्याचे सांगितले जाते. जर काम दुसर्‍या दिवशी करायचे होते, तर आदल्या दिवशी सायंकाळीच हा खटाटोप का करण्यात आला, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे असल्याने रस्ता गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे वाहने सुसाट निघतात. मात्र मध्येच डायव्हर्जन असेल याची साधी कल्पनाही वाहनचालकांना नसल्यामुळे भीषण अपघात झाला, असे स्थानिक सांगतात.

दरम्यान, शुक्रवारी अपघातानंतर सकाळी 8 च्या सुमारास ठेकेदार कंपनीने मार्गावर डायव्हर्जनसाठी टाकलेला माती-मुरूम तत्काळ हटवला आणि वन वेवरची वाहतूक पूर्ववत सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या अपघाताची कसून चौकशी करण्यात यावी, या मागणीने जोर धरला आहे.

ठेकेदार कंपनीचा निष्काळजीपणा
या महामार्गाचे काम मोंटो कार्लो ठेकेदार कंपनी करीत आहे. एकेरी वाहतूक करताना किमान 50 फूट अगोदर वाहनचालकाला त्याची कल्पना यावी यासाठी दिशादर्शक फलक तसेच रेडियमचा वापर, बॅरिकेडिंग आदी उपाययोजना करणे आवश्यक असते. मात्र या ठिकाणी तशी कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच 10 निष्पाप जिवांचा बळी गेल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

पाथरे परिसरात बसस्थानकाजवळ महामार्गावर गतिरोधकांची आवश्यकता आहे. सायाळे – जवळके, बहादरवाडी, पोहेगाव आदी गावांकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोड नाही. वाहनचालकांना विरुद्ध दिशेने जावे लागते. ही उपाययोजना न झाल्यास पुन्हा अशा भीषण अपघाताची पुनरावृत्ती होऊ शकते.

मनोज गवळी,  पाथरे

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news