नगर : स्वयंभूचे पाच कोटी थकीत ; कचरा संकलनाचा बोजवारा, दररोज 20 टन कचरा पडून | पुढारी

नगर : स्वयंभूचे पाच कोटी थकीत ; कचरा संकलनाचा बोजवारा, दररोज 20 टन कचरा पडून

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील कचरा संकलनाचा ठेका पुण्यातील स्वयंभू संस्थेला दिला होता. त्यात संस्थेची मुदत आता संपत आली असून, संस्थेचे पाच कोटी रुपये महापालिकेकडे थकले आहे. त्यात आचारसंहिता सुरू असल्याने कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर, पाच कोटींचे बील थकीत असल्याने कचरा संकलनाचा बोजवारा उडाला आहे. याबाबत सावेडी उपनगरातील महिलांनी उपायुक्तांकडे तक्रारही केली होती.

महापालिकेचा कचरा संकलनाचा ठेका पुण्यातील स्वयंभू संस्थेला दिला होता. त्या संस्थेला पुन्हा तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, स्वयंभूवर गैरव्यवहाराचे व भ्रष्टाचाराचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते. त्यांची चौकशी होऊन स्वयंभू संस्थेविरूद्ध तोफखना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यात महापालिकेने स्वयंभूला आणखी तीन वर्षांची मुदत वाढ दिल्याने पदाधिकार्‍यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आणि स्वयंभू कंपनीला दिलेली वाढीव मुदत रद्द करण्याची मागणी केली. स्वयंभू संस्थेचा मूळ कालावधी संपत आल्याने नवीन संस्थांसाठी निविदा काढण्यात आली होती. त्यातील एका संस्थेचे दर महापालिकेने निश्चित केले आहेत. परंतु, नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने त्याची पुढील प्रक्रिया रखडली आहे.

दरम्यान, स्वयंभू संस्थेच्या ठेक्याची मुदत संपली आहे. त्यामुळे स्वयंभूकडून कचरा संकलनात कचराई होत असल्याचे समोर आहे. सावेडी उपनगरासह विविध भागात कचरा उलला जात नाही, अशा तक्रारी नागरिक आयुक्तांकडे करीत आहेत. साधारण दररोज 150 टन कचरा गोळा होतो. परंतु, सध्या सुमारे 120 टनच कचरा गोळा होत आहे. त्यामुळे सुमारे 20 टन कचरा शहरात पडून राहत आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला कचरा उचलण्याबाबत सूचना कराव्या अन्यथा स्वयंभू संस्थेला दंड करावा, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Back to top button