नगर : घरकुल न बांधणार्या साडेनऊ हजार लाभार्थ्यांना बेड्या?
नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अवघ्या 51 दिवसांत 4759 अपूर्ण घरकुले पूर्ण करत, नगरने राज्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली. आता ज्यांना घरे मंजूर झाली, मात्र कामच सुरू केलेले नाही, अशा लाभार्थ्यांकडेही प्रशासनाने वक्रदृष्टी फिरविली आहे. जिल्ह्यातील 9512 लाभार्थ्यांनी घरे बांधण्यासाठी शासनाकडून पहिला 15 हजारांचा हप्ता उचलला. मात्र, प्रत्यक्षात बांधकामच सुरू केलेले नाही. या लाभार्थ्यांनी शासनाच्या 14 कोटी 56 लाख 80 हजारांच्या निधीचा अपव्यय केल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नगर जिल्ह्याला पंतप्रधान आवास योजनेतून सन 2016-17 ते 2021-22 या कालावधीत 61584 इतके उद्दिष्ट असून, यापैकी 61455 घरकुले मंजूर आहेत. मंजूर घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. आतापर्यंत 42839 घरकुले पूर्ण झालेली आहेत. उर्वरित घरे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत विभागातून गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे.
घरकुलासाठी दीड लाखाचे अनुदान
शासनाच्या घरकुलांच्या कामांसाठी 120000 हजारांचे अनुदान दिले जाते. याशिवाय शौचालय 12 हजार आणि रोजगार हमी योजनेचे 23 हजार 400 रुपये अशाप्रकारे एका लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी शासन दीड लाख रुपये देते. चार टप्प्यात हे अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते.
घर बांधण्यासाठी 120 दिवसांची मुदत
लाभार्थ्याला शासनाचे घरकुल मंजूर झाल्यानंतर त्याला स्थानिक ग्रामपंचायतीकडून याबाबत रितसर तशी माहिती दिली जाते. घरकुलाची जागा व अन्य कागदपत्रे घेऊन काम सुरू करण्याची परवानगी दिली जाते. संपूर्ण घराचे काम पूर्ण करण्यासाठी 120 दिवसांचा कालावधी दिला जातो.
पहिल्या हप्त्यापोटी 14 कोटी उचलले; पण..!
शासनाने लाभार्थ्यांना घरकुलाचे काम सुरू करता यावे, यासाठी आगाऊ 15 हजारांचा हप्ता देऊ केला आहे. जिल्ह्यात अशाप्रकारे 56 हजार 120 लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिलेला आहे. मात्र, यापैकी 9 हजार 512 लाभार्थ्यांनी बँकेत वर्ग झालेला 15 हजारांचा हप्ता काढून घेतला, मात्र घराचे काम अजूनही सुरू केलेले नाही. अशाप्रकारे संबंधित लाभार्थ्यांकडे शासनाचे तब्बल 14 कोटी 26 लाख 80 हजार रुपये रक्कम वसुलीसाठी पात्र ठरले आहेत.
दुसरा हप्ता घेऊनही 3788 घरे कासवगतीने
घराचा पाया भरून आल्यानंतर लाभार्थ्याला 45 हजारांचा दुसरा हप्ता दिला जातो. आतापर्यंत 46 हजार 608 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता दिलेला आहे. मात्र, यापैकी 42 हजार 820 लाभार्थ्यांनीच तिसरा हप्ता उचलला असल्याने, अजूनही दुसरा हप्ता घेतलेल्या 3 हजार 788 घरांची कामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. दुसर्या हप्त्यापोटी वरील लाभार्थ्यांकडे शासनाचे 17 कोटी 4 लाख रुपये वसुलीस पात्र ठरू शकतात.
तिसरा अन् चौथ्या हप्त्यातून घरे पूर्ण
लाभार्थ्याला तिसरा हप्ता हा 40 हजारांचा दिला जातो आणि शेवटचा चौथा हप्ता हा 20 हजारांचा दिला जातो. पहिला आणि दुसर्या हप्त्यातून घराची कामे वर आल्यानंतर अनुक्रमे उर्वरित दोन्ही हप्ते त्या-त्या वेळी दिली जातात. या कामांनाही आणखी गती द्यावी लागणार आहे. दरम्यान, पहिला हप्ता घेऊनही अनेकांनी अद्याप काम सुरू केलेले नाही. संबंधित लाभार्थ्यांनी एक तर काम सुरू करावे, किंवा ती रक्कम शासनाकडे परत करावी, असे दोनच पर्याय आता खुले आहेत.
ग्रामसेवक फिर्याद दाखल करणार
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, तसेच राज्य पुरस्कृत घरकुल मंजूर लाभार्थी यांनी योजनांचे अनुदान बँक खात्यातून काढून घरकुलाचे काम पूर्ण केलेले नाही. या लाभार्थ्यांना तोंडी व लेखी सूचना वारंवार केल्या आहेत. तसेच, लाभार्थ्यांना लोकअदालत मार्फत नोटिसा देऊनही लाभार्थ्यांना मिळालेले अनुदान शासन जमा केलेले नाही किंवा घरकुलाचे काम केलेले नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना गटविकास अधिकार्यांनी ग्रामसेवकांना दिल्या आहेत.