नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस आणि त्यानंतरही वारंवार नोटीस देऊनही धोकादायक वाडे, इमारती तसेच घरे खाली केली जात नसल्यामुळे आता आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संबंधित धोकादायक इमारती कोसळल्यास घरमालकावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच धोकादायक वाडे आणि घरे खाली करून घेण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांची असल्याने त्यांवरही कारवाई निश्चित केली जाणार आहे.
नाशिक शहरातील पंचवटी आणि जुने नाशिक भागातील गावठाणात सर्वाधिक जुने वाडे आणि घरे आहेत. यातील बहुतांश वाडे आणि घरे ही धोकादायक झालेली आहेत. त्यामुळे हे वाडे कधी कोसळतील याचा भरवसा राहिलेला नाही. पावसाळ्यात तर वाडे आणि घरे कोसळण्याच्या घटना जुने नाशिक भागात हमखास घडतात. वाडे, घरे कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. यामुळे या पुढील काळात तरी किमान त्यास अटकाव बसावा यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
दरवर्षी पावसाळ्याआधी मनपाकडून संबंधित धोकादायक वाडे व घरमालकांना नोटिसा बजावल्या जाऊन घरे खाली करण्याची सूचना केली जाते. मनपाकडून नोटिसा दिल्यानंतर संबंधित घरमालकाने धोकादायक मिळकत न उतरवल्यास वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई मनपाकडून व्हायला हवी परंतु, पावसाळ्यात संबंधित लोकांच्या स्थलांतराचा प्रश्नही निर्माण होतो. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात धोकेदायक इमारती, घरे तसेच वाड्यांचे सर्वेक्षण करून ३० वर्षांपूर्वीच्या घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश दिले होते. धाेकादायक मिळकती असल्यास तेथील रहिवाशांना नोटीस देऊन सुरक्षितस्थळी हलविण्याची सूचनाही त्यांनी केली होती. मात्र, त्याबाबत आजवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे जुन्या व धोकादायक वाड्यांबाबतचा प्रश्न कायम आहे.
मागील आठवड्यातच एका वाहनाच्या धडकेचे कारण ठरत अशाेकस्तंभ येथील धाेकादायक वाडा अचानक कोसळला. यामुळे मनपा आयुक्तांनी पुन्हा एकदा धोकादायक मिळकतींचा मुद्दा हाती घेत घरमालकांबरोबरच विभागीय अधिकाऱ्यांनाही कारवाईचा इशारा दिला आहे.
विभाग – धोकेदायक घरे, वाडे
नाशिक पश्चिम – ६००
सातपूर – ६८
नाशिक पूर्व – ११७
नवीन नाशिक – २५
पंचवटी – १९८
नाशिकरोड – ६९
एकूण – १,०७७
हेही वाचा :