

रमेश चौधरी
शेवगाव : येथे तयार झालेल्या धाग्याने परदेशात भरारी घेतली आहे. उजाड माळरानावर उभारलेल्या सूतगिरणीचा डंका साता समुद्रापार पसरला असून, आता ग्रामीण भाग कुठल्याही निर्मितीच्या स्पर्धेत यशस्वी वाटचाल करू शकतो, हे उद्योग समुहाचे संस्थापक अॅड.शिवाजीराव काकडे व माजी जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी दाखवून दिले आहे.
ग्रामीण भागात अनेक सुविधेचा अभाव असल्याचा समज झाल्याने उद्योजक उद्योगासाठी शहराचे स्थान निवडतात. सुविधांचा विचार करता ग्रामीण भागात उद्योग उभारणे हे एका अर्थाने धोक्याचे आहे. मात्र, ध्येय स्पष्ट असले की ऊर्जा आपोआप मिळते. तद्वत शेवगाव सारख्या दुर्गम भागात अॅड.शिवाजीराव काकडे यांनी उभारलेल्या जनशक्ती टेक्सटाईल कंपनीने उभारी घेत ध्येय प्रत्यक्षात साकारले आहे.
ग्रामीण भागात आबासाहेब काकडे शिक्षण संस्थेची वाटचाल करताना अविकसित खेड्यांचा विकास व्हावा, हा दृष्टिकोन समोर ठेवून राजकारणाचा यशस्वी आधार घेतल्यानंतर उद्योगाचा गंध नसणार्या प्रभाकर विश्वनाथ कुलकर्णी या अंध व्यक्तीच्या मार्गदर्शनाने अॅड. काकडे यांनी शेवगाव येथे सालवडगाव शिवारात 25 एकर पडिक जमिनीवर जनशक्ती टेक्सटाईल मिल लि. हा कपाशी पासून धागा तयार करण्याचा अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांतील एकमेव उद्योग उभारला.
या मिलसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने जपान, स्वित्झर्लंड, इटली, जर्मनी येथील अत्याधुनिक स्वयंचलित मशिनरी आहेत. येथील 21 के. डब्लू (धागा ) बनवताना त्यास विशिष्ट प्रत दिली. खास प्रतीसाठी स्वित्झर्लंड येथून खरेदी केलेले 4 कोटीचे मशीन बसविले आहे. भविष्याचा वेध घेत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने येथे जनशक्तीचा ब्रॅण्ड तयार झाला आहे. पूर्ण समर्पित भावनेने उद्योग सुरू करताना अॅड. काकडे यांनी अनेक संकटाला सामोरे जात आठ-दहा वर्षांत हा प्रकल्प सुरू केला. न्यूयार्क सेंटर पॉइर्ंटच्या मार्केटिंग बदलावर धाग्याचे दर कमी जास्त होतात.
इचलकरंजी, इंदूर, धुळे, दिल्ली अशा ठिकाणी जनशक्ती टेक्सटाईल धाग्याची मागणी होत असताना धाग्याच्या उच्चप्रतिचा विचार करता आता भोपाळ, चीन, नेदरलँड, बांगलादेश अशी परदेशात याची मागणी वाढली असून, शेवगाव सारख्या ग्रामीण भागात उभारलेल्या उद्योगाचा हा धागा सध्या चिनला निर्यात होत असल्याने शेवगाकरांच्या दृष्टीने ही बाब अभिमानास्पद आहे. अॅड. काकडे व त्यांची टीम यांचा सतत उद्योजकांशी संपर्क, विविध मिलला भेटी, बाजारपेठेचा अभ्यास, यावरून या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी जागेची तरतूदही करण्यात आली आहे. रोजगाराचा प्रश्नही सुटत आहे.