सावेडीतील अर्बन बँक कॉलनीत घरफोडी; 72 हजारांचा ऐवज चोरीला | पुढारी

सावेडीतील अर्बन बँक कॉलनीत घरफोडी; 72 हजारांचा ऐवज चोरीला

नगर; पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरातील अर्बन बँक कॉलनीत घरफोडी करत चोरट्यांनी दागिने व रोख असा 72 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. 20 ते 23 फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली आहे. याबाबत सुभाष धोंडीबा कडलग (रा.अर्बन बँक कॉलनी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्बन बँक कॉलनीत सुभाष कडलग यांचे घर आहे.

ते संगमनेर येथील एका महाविद्यालयाचे प्राचार्य असल्याने आठवड्यातून काही दिवस संगमनेर येथे वास्तव्यास असतात. कडलग यांच्या मेव्हण्याचा अपघात झाल्यामुळे कुटुंबीय घराला कुलूप लावून पुणे येथे गेले होते. गुरुवारी (दि.23) सकाळी कडलग यांच्या पत्नीला त्यांच्या घरकाम करणार्‍या महिलेने दरवाजाचे कुलूप तुटल्याचे कळविले.

त्यामुळे कडलग हे संगमनेहूर तत्काळ नगरला आले. पाहणी केली असता घरातील दागिने व रोख चोरी गेल्याचे निदर्शनास आले. 45 हजारांची रोख व 27 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी याबाबत घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button