नाशिक : कापडणीस खून खटल्यास मार्चमध्ये होणार सुरुवात, ॲड. उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद

नानासाहेब कापडणीस, अमीत कापडणीस
नानासाहेब कापडणीस, अमीत कापडणीस
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंडित कॉलनीतील कापडणीस पिता-पुत्रांचा निर्घृण खून करत त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावून तसेच कापडणीस यांच्या लाखो रुपयांचे शेअर्सची परस्पर विक्री केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे. या खटल्याची सुनावणी मार्च महिन्यात होणार असून, सरकारी पक्षातर्फे ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी चार संशयितांना अटक केलेली आहे.

गतवर्षी मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांचा मृतदेह दोन टप्प्यांत परजिल्ह्यात बेवारस सापडले होते. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक घटना समोर आल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती व क्रूरता समोर आली. अतिशय थंड डोक्याने कट रचून पिता-पुत्रांचा खून करीत त्यांच्या डिमॅट खात्यातील शेअर्सची परस्पर विक्री करून सुमारे सव्वा कोटी रुपये तसेच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बळकावण्याचा बेत मुख्य संशयित राहुल जगतापसह त्याचा साथीदार संशयित प्रदीप शिरसाठ, विकास हेमके आणि सूरज मोरे यांनी केला होता. त्यासाठी दोघांनी डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत पिता-पुत्रांचा खून करीत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहांची परजिल्ह्यात विल्हेवाट लावली होती. गुन्हा उघडकीस आणल्यानंतर संशयितांविरोधात सबळ पुरावे गोळा करून संशयितांची फेब्रुवारी २०२२ मध्ये धरपकड केली. या गुन्ह्यात पोलिसांनी सुमारे १६०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असून, संशयितांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले आहेत. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी नाशिक पोलिसांनी केलेल्या शिफारसीनुसार गृहविभागाने गंभीर दखल घेत या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, खटल्याच्या युक्तिवादाला लवकरच सुरुवात होणार आहे.

असे घडलेले दुहेरी हत्याकांड

कापडणीस कुटुंबीयांचे त्यांच्या नातलगांसोबत किंवा परिसरात इतर कोणाशी जास्त संवाद नसल्याचे राहुल गौतम जगताप यास माहिती होते. त्याने डॉ. अमितसोबत ओळख वाढवून विश्वास संपादन केला. त्यानंतर अमितकडून नानासाहेब कापडणीस यांच्या मालमत्तेबाबत सर्व माहिती घेतली. दोघांचाही खून करून मालमत्ता हडप करण्याचा कट रचला. त्यानुसार कापडणीस यांचे ९७ लाख रुपयांचे शेअर्स, शहरातील चार फ्लॅट्स, एक गाळा, देवळाली कॅम्प येथील रो हाउस, सावरकरनगर येथील निर्माणाधीन तीनमजली आलिशान बंगला यासह इतर मालमत्ता राहुल हडपण्याच्या प्रयत्नात होता. २८ जानेवारी २०२२ रोजी सरकारवाडा पोलिस ठाण्यात कापडणीस पिता-पुत्र बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल झाली. पोलिसांनी केलेल्या तपासात नानासाहेब कापडणीस यांच्या डिमॅट खात्यातून सुमारे ९७ लाख रुपयांच्या शेअर्सची विक्री होऊन त्याचे पैसे शिरसाठच्या बँक खात्यात वर्ग झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी शिरसाठकडे चौकशी केल्यानंतर ते पैसे जगतापने घेतल्याचे समजले. जगतापच्या चौकशीत दोघांचा खून झाल्याचे उघड झाले. त्याने साथीदारांच्या मदतीने नासाहेबांच्या मृतदेहाची विल्हेवाट मोखाडा येथे, तर अमितचा मृतदेह राजूर येथे जाळल्याची कबुली दिली. पोलिसांनी जगतापला राहत्या घरातून तर, फरार तिघांना औरंगाबादमधून ताब्यात घेतले होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news