पारगाव : मीना शाखा कालव्याला आवर्तन सुटले | पुढारी

पारगाव : मीना शाखा कालव्याला आवर्तन सुटले

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : मीना शाखा कालव्याला रब्बी हंगामातील शेवटचे आवर्तन सुटले आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील गावांमधील कांदा, गहू व इतर पिकांना मोठा फायदा होणार आहे. पारगाव परिसरात रब्बी हंगामातील कांदा, गहू ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. परिसरात कडक उन्हाळा जाणवत असल्याने या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता होती.

जलसंपदा विभागाने मीना शाखा कालव्यात नुकतेच रब्बीचे शेवटचे आवर्तन सोडले. यामुळे कांदा, गहू उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. अंतिम टप्प्यात पिकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळणार असल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मीना शाखा कालवा आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गांजवेवाडी परिसरातून जातो. कालव्याच्या वितरिकांमध्ये पाणी सोडल्यास वळती, काटवान वस्ती, मालजेवस्ती, मोढे वस्ती, अजाब वस्ती, गोरडे मळा आदी भागांतील पिकांना फायदा मिळतो.

 

Back to top button