पुणे : टक्का घसरला; धक्का कुणाला? भाजपच्या हक्काच्या बालेकिल्ल्यात कमी मतदान | पुढारी

पुणे : टक्का घसरला; धक्का कुणाला? भाजपच्या हक्काच्या बालेकिल्ल्यात कमी मतदान

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची हक्काची व्होटबँक असलेल्या सदाशिव, नारायण, शनिवार पेठांमधील मतदानाची टक्केवारी 2019 च्या तुलनेत घटल्याचे समोर आले आहे. याच भागातून आमदार मुक्ता टिळक यांना तब्बल 21 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. पोटनिवडणुकीत पाच टक्के मतदान घटले आहे. हा धक्का नेमका कुणाला बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत 50.6 टक्के इतके मतदान झाले. या मतदारसंघात महापालिकेचे जवळपास प्रभाग क्र. 15, 16, 17, 18, 19 आणि 29 हे सहा प्रभाग येतात. त्यामधील प्रभाग 15 आणि 29 हे दोन प्रभाग मतदारसंघाच्या छत्रपती शिवाजी रस्त्याच्या पश्चिम भागात येतात. या दोन्ही प्रभागात भाजपला मानणारा मोठा मतदारवर्ग आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सदाशिव-नारायण पेठ या प्रभाग क्र. 15 मध्ये आणि नवी पेठ-पर्वती या प्रभाग क्र. 29 या दोन्ही प्रभागांत भाजपचे वर्चस्व राहिले होते. प्रामुख्याने प्रभाग क्र. 15 मध्ये 57 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये तब्बल 68 टक्के मते भाजपच्या उमेदवाराला म्हणजेच टिळकांना 21 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. आता मात्र ही टक्केवारी पाच टक्के इतकी घटून 51.89 टक्के इतके म्हणजे 37 हजार 237 टक्के मतदान झाले आहे.

गेल्या वेळेच्या तुलनेत जवळपास साडेचार हजार मतदान कमी झाल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्र. 29 मध्ये दोन टक्के इतके मतदान घटले आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. उर्वरित प्रभाग क्र. 16, 17, 18, 19 या प्रभागांत मतदानाच्या टक्केवारीत अर्धा ते दोन टक्के फरक पडलेला आहे. हे भाग प्रामुख्याने पूर्व भागात येतात. या ठिकाणी महाविकास आघाडीला अधिकाधिक आघाडीची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात या प्रभागातील मतदानाची टक्केवारी वाढलेली नाही. त्यामुळे काँग्रेसची धाकधुक
वाढली आहे.

कसबा विधानसभा निवडणूक : 2019
प्रभाग एकूण मतदान झालेले मतदान टक्के
प्रभाग क्र. 15 72480 41777 57
प्रभाग क्र. 16 29336 15918 54.26
प्रभाग क्र. 17 61325 29527 47.76
प्रभाग क्र. 18 61049 29341 48.04
प्रभाग क्र. 19 24783 11387 45
प्रभाग क्र. 29 41797 22109 52.64
एकूण 290770 1,50,057 51.64

पोटनिवडणूक विधानसभा : 2023
प्रभाग एकूण मतदान झालेले मतदान टक्के
प्रभाग क्र. 15 71756 37237 51.89
प्रभाग क्र. 16 30128 16999 56.42
प्रभाग क्र. 17 55950 27653 49.42
प्रभाग क्र. 18 56185 26600 47.34
प्रभाग क्र. 19 22979 10613 46.16
प्रभाग क्र. 29 38050 19053 50.12
एकूण 2,75,679 138019 50.06

Back to top button