नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात आता उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे अतिदक्षता विभाग (आयसीयू) साकारणार असून, यात प्रौढांसाठी 100, तर लहान मुलांसाठी 42 खाटांचा स्वतंत्र विभाग असेल. या संदर्भातील प्रस्ताव मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरात आतापर्यंत तब्बल दोन लाख 65 हजार 340 जण कोरोना बाधित झालेत. त्यापैकी चार हजार 50 जणांचा मृत्यू झाला असून, कोरोना काळात महापालिकेचे नवीन बिटको रुग्णालय केवळ नाशिकच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रासाठीही महत्त्वाचे ठरले आहे. कोरोनाच्या गेल्या दोन ते अडीच वर्षांत या रुग्णालयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या अनुषंगाने नूतन बिटको रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्स तसेच लहान मुलांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची सज्जता ठेवण्यात आली आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयात अतिदक्षता विभागाची 50 बेड्सची सुविधा उपलब्ध असून, सर्वांत मोठा अतिदक्षता विभाग सुरू करण्याचा मनपाचा प्रस्ताव आहे.
त्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शासनाच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. 100 खाटांच्या आयसीयूकरिता 16 कोटी, तर लहान मुलांकरिता 42 खाटांच्या स्वतंत्र आयसीयूसाठी 14 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेने शासनाकडे केली आहे.
अतिदक्षता विभाग साकारण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्याबाबत शासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष आहे. शासनाने प्रस्ताव मान्य केल्यास उत्तर महाराष्ट्रासाठी मनपाचे हे रुग्णालय संजीवनी ठरू शकेल.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.