सात दिवस चाललेला शाही विवाह सोहळा! | पुढारी

सात दिवस चाललेला शाही विवाह सोहळा!

लंडन : ब्रुनेईचे सुल्तान व पंतप्रधान हस्सनल बोल्कीयाह यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होते. दोन हजारांवर महागड्या मोटारींचा ताफा असणार्‍या या सुल्तानाच्या लाडक्या लेकीचे लग्न शाही थाटातच होणार हे उघडच आहे. राजकुमारी फादजीला लुबाबुल बोल्कीयाह हिच्या लग्नाचा सोहळा तब्बल सात दिवस थाटामाटात सुरू होता.

या लग्नासाठी खास पोशाख तयार करण्यात आले होते व त्यापैकी काही पोशाखांवर हस्तीदंती कामही होते. शाही जोडप्याच्या पोशाखांवर जरतारीचे काम केले होते. राजकुमारीने लग्नसोहळ्यात परिधान केलेल्या मुकुटावर जगभरातील काही मौल्यवान रत्ने जडवलेली होती. त्यामध्ये सुंदर पाचूंचा समावेश होता. ब्रुनेईच्या सुल्तानाच्या आलिशान महालात म्हणजेच इस्ताना नुरुल ईमान येथे हा विवाह सोहळा झाला. हा जगातील सर्वात मोठ्या शाही महालांपैकी एक आहे.

याठिकाणी 1700 पेक्षाही अधिक सुंदर खोल्या आहेत. राजकुमारीला ब्रुनेईत ‘स्पोर्टी प्रिन्सेस’ म्हणूनही ओळखले जाते. त्या ब्रुनेईच्या राष्ट्रीय हॉकी संघाच्या कर्णधारही आहेत. ब्रिटनच्या किंग्सन विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली आहे. ती सुल्तानाची दुसरी पत्नी हजाह मरियम यांची कन्या आहे. नवरदेवाने हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूलमधून बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे उच्च शिक्षण घेतले आहे. फादजीला यांचे धाकटे बंधू प्रिन्स मतीन यांनी लग्नाची काही छायाचित्रे सोशल मीडियात शेअर केली आहेत. ब्रुनेई हा देश कच्च्या तेलाने संपन्न आहे. जगातील सर्वात श्रीमंत शासकांमध्ये येथील सुल्तानाचे नाव घेतले जाते. त्यांना एकूण बारा अपत्ये आहेत.

Back to top button