पुढारी ऑनलाईन डेस्क: चंद्राचा काही भाग काबीज करून हक्क सांगण्यासाठी चीन अवकाशात गुप्त लष्करी कार्यक्रम राबवत आहे. चीनबाबत असा धक्कादायक दावा नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी केला आहे. नासा ही अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था आहे. (NASA On Moon)
नेल्सन यांनी पुढे म्हटले आहे की, चीनने नेहमीच अवकाशातील आपल्या कृती या पूर्णपणे वैज्ञानिक असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही प्रकारे अतिक्रमण करणे हा त्याचा उद्देश नाही, पण चीनचा हेतू वेगळा आहे. चीनने अंतराळ क्षेत्रात कमालीची प्रगती केली आहे. त्यामुळे आम्हाला असे वाटते की, त्याचे बहुतांश कार्यक्रम गुप्तच राहिले आहेत. अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश चंद्रावर कायमस्वरूपी तळ बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. या वर्षी मार्चमध्ये, चीनी शास्त्रज्ञांनी डिस्नेलँडच्या आकाराचा चंद्राचा तळ तयार करण्याची घोषणा केली होती, असे देखील नासा प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. (NASA On Moon)
चीनच्या आत्तापर्यंतच्या कृतींवरून चंद्राचा काही भाग ताब्यात घेणे हाच, त्यांचा उद्देश असल्याचे दिसत आहे. चीन आणि आम्ही एकाच शर्यतीत आहोत. 2030 पर्यंत आम्ही (अमेरिका) चंद्रावर उतरण्याची तयारी करत आहे. आम्हाला तिथे लवकर पोहोचायचे आहे. दरम्यान आर्टेमिस III हे नासाचे यान सप्टेंबर 2026 मध्ये लॉन्च होईल, असे देखील नासा प्रमुख बिल नेल्सन यांनी म्हटले आहे.
वास्तविक, अमेरिकेला चंद्राची नेहमीच काळजी असते. तो चीनला आपला सर्वात महत्त्वाचा प्रतिस्पर्धी मानतो. पण अमेरिका चीनच्या कितीतरी पुढे असल्याचा दावा नेल्सन यांनी केला आहे. ते म्हणाले की, जर चीनने तेथे आपले तळ तयार करण्यास सुरुवात केली. तर ते चंद्राच्या काही भागांवर दावा करू शकेल. नासाला याची चिंता आहे कारण चीनने 2022 मध्ये आधीच आपले स्पेस स्टेशन बनवले आहे. यासह त्याने आपल्या उपग्रहांची संख्या दुप्पट केली आहे, असेही नेल्सन म्हणाले.