NASA : सूर्याच्या प्लाझ्मा उद्रेकातून ‘नासा’चे यान सहिसलामत बाहेर | पुढारी

NASA : सूर्याच्या प्लाझ्मा उद्रेकातून ‘नासा’चे यान सहिसलामत बाहेर

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी ‘पार्कर सोलर प्रोब’ हे यान 2018 मध्ये पाठवलेले आहे. या यानाने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी सौर वायुमंडळात प्रवेश केला. त्यावेळी एका शक्तिशाली कोरोनल मास इजेक्शनमध्ये हे यान अडकले होते. या कोरोनल मास इजेक्शनच्या प्रभावाचा व्हिडीओही यानाने टिपून घेतला आहे. हा व्हिडीओ ‘नासा’ने जारी केला आहे. प्लाझ्माच्या या उद्रेकातून हे यान सहिसलामत बाहेर पडले.

पार्कर सोलर प्रोब 5 सप्टेंबर 2022 या दिवशी सूर्याजवळून गेले होते. त्यावेळेच्या या घटनेचा व्हिडीओ ‘नासा’ने आता शेअर केला आहे. त्यामध्ये हे यान कोरोनल मास इजेक्शनमधून कसे बाहेर पडले हे दिसून येते. त्यावेळी ते आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली कोरोनल मास इजेक्शनमधून गेल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे. त्यावरून या यानाची निर्मिती करण्यामागील इंजिनिअरिंगचे यशही दिसून येते. आपल्या सौर चक्रादरम्यान सूर्यावरील हालचालींमध्ये वाढ होत असते. त्याला ‘सोलर मॅक्झिमम’ असे म्हटले जाते.

या काळात सूर्यावरील चुंबकीय क्षेत्र आपल्या सर्वात खालच्या स्तरावर असते, जे पृथ्वीसाठी चांगले नसते. याचे कारण म्हणजे चुंबकीय क्षेत्र हे एखाद्या ढालीसारखे काम करीत असते जे सोलर रेडिएशन, सौर ज्वाळा आणि कोरोनल मास इजेक्शनला रोखते. ‘सनस्पॉट’ हे असे क्षेत्र असतात जे सूर्यावरील काळ्या ठिपक्यांसारखे दिसतात. ते अन्य भागाच्या तुलनेत थंड असल्याने काळे दिसतात. याच डागांपासून सोलर फ्लेअर निघतात. त्यांच्यापासून अंतराळात मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा उत्सर्जित होत असतो. जर तो थेट पृथ्वीला धडकला तर रेडिओ सिग्नल्समध्ये समस्या निर्माण करू शकतो.

Back to top button