वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडले अमेरिकेच्या 'नासा' या अंतराळ संशोधन संस्थेच्या 'अपोलो 11' या मोहिमेत. त्यानंतर 1972 पर्यंत 'अपोलो' मोहिमांमधून अनेक अंतराळवीर चांद्रभूमीवर जाऊन आले. मात्र, गेल्या अर्धशतकाच्या काळात अंतराळवीर चांद्रभूमीवर उतरलेले नाहीत. आता 'नासा'ने 'आर्टेमिस-3' मोहिमेतून पुन्हा एकदा आपले अंतराळवीर चंद्रावर पाठवण्याची तयारी केली आहे. मात्र, इतक्यावरच थांबण्याची 'नासा'ची तयारी नाही. 2040 पर्यंत चंद्रावर चक्क मानवी वसाहत स्थापन करण्याचीही महत्त्वाकांक्षी योजना 'नासा' बनवत आहे.
चंद्रावरील ही मानवी वसाहत केवळ अंतराळवीरांसाठीच असेल असे नाही; तर ती सर्वसामान्य नागरिकांसाठीही असेल. 2040 पर्यंत चंद्रावर अमेरिकेची पहिली मानव वसाहत निर्माण होईल, असा 'नासा'ला विश्वास आहे. 'न्यूयॉर्क टाईम्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार चंद्रावर एक थ—ी-डी प्रिंटर पाठवला जाईल. चांद्रभूमीवरीलच सामग्री वापरून तिथे या थ—ी-डी प्रिंटरच्या साहाय्याने विविध रचना बनवल्या जातील. पृथ्वीवर अशा थ्री- डी प्रिंटरच्या साहाय्याने अनेक वस्तू व चक्क घरेही बनवली जात आहेत. तसाच वापर चंद्रावर केला जाऊ शकतो.
अर्थात, चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्यासाठीचा निश्चित केलेला काळ हा अनेकांना अतिरंजितच वाटत आहे. आणखी केवळ 17 वर्षांच्या काळातच चंद्रावर मानवी वसाहत स्थापन होईल, याची अनेकांना खात्री वाटत नाही. याचे कारण म्हणजे अंतराळात, चंद्रावर जाऊन त्यासाठीची इतक्या कमी वेळेत तयारी करणे हे वाटते तितके सोपे काम निश्चितच नाही. मात्र, 'नासा'ने आपली उद्दिष्टे साध्य करण्याचे काम सुरूच ठेवले तर हे शक्य होईल, असा विश्वास 'नासा'च्या संशोधकांनी व्यक्त केला आहे. 'नासा'च्या तंत्रज्ञान विभागाच्या संचालिका निकी वेर्खेसर यांनी याबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या, हे सर्व काही स्वप्नवत आहे आणि ते साकार करण्यासाठीच्या महत्त्वाच्या क्षणी आपण सध्या आहोत. हे समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची योग्य माणसेही आता एकत्र आलेली आहेत.
'नासा' ही महत्त्वाकांक्षी योजना एकट्याच्याच बळावर साकार करणार नाही. यासाठी काही खासगी कंपन्यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच शिक्षण व उद्योगजगतातील तज्ज्ञांचीही यासाठी मदत घेतली जाईल.