NASA : ‘नासा’ने टिपली दोन महाकाय ग्रहांची धडक | पुढारी

NASA : ‘नासा’ने टिपली दोन महाकाय ग्रहांची धडक

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने पृथ्वीपासून सुमारे 1800 प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या दोन महाकाय ग्रहांची धडक कॅमेर्‍यात कैद केली आहे. अतिशय मोठ्या आकाराच्या दोन बर्फाळ ग्रहांची ही धडक होती. या धडकेमुळे डोनटच्या आकाराचा ढग तयार झाला. हा ढग बाष्पयुक्त खडक आणि पाण्यापासून बनलेला होता.

या दोन ग्रहांच्या धडकेने प्रचंड मोठी ऊर्जा निर्माण झाली आहे. त्यामधून नवे ग्रह निर्माण होण्याचाही अंदाज आहे. ‘न्यू सायंटिस्ट’च्या रिपोर्टनुसार या घटनेमुळे ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि नव्या ग्रहांची निर्मिती याबाबतचे रहस्य उलगडण्यास मदत मिळेल.

पृथ्वीपासून तब्बल 1800 प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या ‘एएसएएसएसएन-21 क्यूजे’ असे नाव दिलेल्या तार्‍याचा अभ्यास करीत असताना संशोधकांना या दोन ग्रहांची धडक दिसून आली. दोन वर्षे त्यांनी या खगोलीय घटनेचा अभ्यास केला. त्याचा अहवाल आता ‘नेचर’ या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. नेदरलँडच्या लीडन ऑब्झर्व्हेटरीमधील डॉ. मॅथ्यू केनवर्दी यांनी सांगितले की ही घटना अतिशय प्रेक्षणीय अशीच होती.

Back to top button