नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
लग्न कर नाहीतर मारून टाकेन; अशी धमकी दिल्यामुळे सैताणे गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने जीवन संपवल्याची घटना उघडकीस आल्याने एका विरुद्ध जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या फरार संशयीताचा शोध घेत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ही जीवन संपवल्याची घटना घडली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील सैताने गावातील रहिवासी रोशनी खंडु सोनवणे (भिल) वय- १७ वर्षे हीच्या मागे संजय मगरे नामक व्यक्तीने तगादा लावला होता. त्याला कंटाळून २३ फेब्रुवारी २०२४ रोजी रोशनी सोनवणे हिने जीवनप्रवास थांबिवल्याचे मयत मुलीच्या पित्याचे म्हणणे आहे. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात याविषयी दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, रोशनी खंडु सोनवणे हिस संजय मगरे याने फोन करुन "तु मनी संग लगीन ना करनी तर एक तर तु मरी जा ना तर मी तुला मारी टाकसु" असे बोलुन रोशनी सोनवणे हिस जीवन संपविण्यास भाग पाडले. संजय याने मोबाईल वरून संभाषण केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे समजते. त्यावरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात संजय चैत्राम यांच्या विरोधात जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याचे मंगळवार (दि.१६) रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. तथापि संजय चैत्राम मगरे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार हे अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा: