पुढारी ऑनलाईन डेस्क : रामनवमी निमित्त आज बुधवारी (दि.१७) अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा अद्भुत असा सूर्यतिलक सोहळा पार पडला. अभिजित मुहूर्तावर सुर्यकिरणांनी रामलल्लाच्या कपाळाला स्पर्श केला. सूर्यकिरणे रामलल्लाच्या कपाळावर दुपारी ११.५८ ते १२.०२ पर्यंत राहिली. भक्ती आणि विज्ञानाचा अद्भुत संगमाचा हा सोहळा आज सर्व जगाने भक्तिभावाने पाहिला. (Ram Navami 2024 PM Modi)
दरम्यान, सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही वेळात वेळ काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमीच्या निमित्ताने अयोध्या मंदिरातील रामलल्लाचा 'सूर्यतिलक' क्षण पाहिला. पीएम मोदी सध्या आसाममध्ये आहेत. पीएम मोदींनी विमान प्रवासातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ते त्यात त्यांच्या हातातील टॅबलेटवरील स्क्रीनवर सूर्यतिलक सोहळा क्षणाचे रेकॉर्डिंग पाहत असताना दिसतात. यावेळी मोदींनी पायातील बूट काढून अनवाणी पायाने हा सोहळा पाहिला. पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, कोट्यवधी भारतीयांप्रमाणेच माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण होता. नलबारी येथील रॅलीनंतर मी रामलल्लाला स्पर्श केलेला सूर्यतिलक पाहिला.
हा सूर्यतिलक आमच्या जीवनात उर्जा आणू दे आणि आपल्या देशाला यशाची नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरणा देवो," असे पीएम मोदींनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
अयोध्येतील सूर्यतिलकवेळी नऊ शुभ योगासह तीन ग्रहांची स्थिती त्रेतायुगात होती, तशीच यावेळीही होती. दुपारी १२ वाजता सूर्यतिलक झाला. तेव्हा केदार, गजकेसरी, पारिजात, अमला, शुभ, वाशी, सरल, काहल आणि रवियोग घडले. या नऊ शुभ योगांत रामलल्लांचा सूर्यतिलक झाला. रामजन्मप्रसंगी सूर्य आणि शुक्र आपल्या उच्च राशीत होते; तर चंद्र स्वतःच्या राशीत उपस्थित होता. या वर्षीही योगायोगाने असेच घडत आहे. ग्रहांची ही दशा देशासाठी शुभ संकेत आहे, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.
सूर्यतिलक सोहळा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाला. शिखरावर रिफ्लेक्टर यंत्रणा बसविण्यात आली होती त्याद्वारे सूर्याच्या किरणांनी प्रवास केला व गर्भगृहात त्यांनी रामलल्लाच्या कपाळाला स्पर्श केला. रामलल्लाच्या कपाळावर सुमारे ७५ मिमीचा टिळक लावण्यात आला होता. सूर्यतिलक स्पष्टपणे दिसावा व रामलल्लालाही उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कपाळावर चंदनाचा लेप लावण्यात आला होता. हा भक्ती आणि विज्ञानाचा अद्भुत संगम रामभक्त भक्तिभावाने पाहत राहिले.
हे ही वाचा :