नागपूर : काँग्रेस सुधाकर अडबालेंच्या पाठीशी तर झाडेसाठी कपिल पाटील मैदानात!

नागपूर : काँग्रेस सुधाकर अडबालेंच्या पाठीशी तर झाडेसाठी कपिल पाटील मैदानात!
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अधिकच रंगतदार घडामोडी सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर करण्यात आले. मात्र काँग्रेस नेमकं कुणाला समर्थन देणार, याविषयीचा तिढा सोडविण्यासाठी आज माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे माजी मंत्री सुनील केदार आणि इतर नेत्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये सर्वानुमते पक्ष अडबले यांच्या पाठीशी राहणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे गंगाधर नाकाडे यांना प्रचाराला प्रारंभ केल्यानंतर माघार घ्यावी लागली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षश्रेष्ठींनी समजूत घातल्यानंतर इटकेलवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे अपेक्षित होते. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी आदेश देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने अखेर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही इटकेलवार यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अडबाले यांच्या पाठीशी उभी असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर् पेठे यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे पदवीधर निवडणुकीत मदत करा, आम्ही तुम्हाला शिक्षक मतदारसंघात मदत करू, असा शब्द देऊनही काँग्रेसने तो पाळला नसल्याची नाराजी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी बोलून दाखविली. झाडे यांच्यासाठी शिक्षक भारतीचे नेते आमदार कपिल पाटील स्वतः नागपुरात मैदानात उतरल्याने ही लढत रंगतदार झाली आहे.

विद्यमान आमदार नागो गाणार यांच्यासाठी भाजपची शिक्षक आघाडी नाराजी पचवून कितपत काम करणार यावर सर्व गणिते अवलंबून असणार आहेत. या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघात एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. सुरुवातीला नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. मात्र, त्यामुळे नागपुरात काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला. शिक्षक भारतीचे झाडे आणि अडबाले यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते इटकेलवार यांनीही अर्ज दाखल केला होता. मविआतच चार दावेदार झाल्याने एकजूट दाखविण्यात नेते कमी पडले. एकाने माघार घेतली असली तरी तिघे मैदानात कायम असल्याने मतविभाजनात फायदा भाजपलाच होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news