पुढारी ऑनलाईन डेस्क : मानवतेला काळीमा फासणारी एक अमानुष घटना तेलगंणा राज्यातील हैदराबादपासून ५० किलोमीटरवर असलेल्या चौतुप्पल शहरात घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. एका २५ वर्षीय नराधमाने महिलेवर बलात्कार करून तिचा खून केला. त्यानंतरही त्याच्यातील हैवान शांत झाला नाही. पीडित महिलेच्या मृतदेहावरही त्याने बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार केला. दरम्यान, महिलेची हत्या करून तिचे सोन्याचे दागिने घेऊन हा नराधम पसार झाला होता. बांधकाम सुपरवायझर असलेल्या या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही निर्दयी घटना चौतुप्पल शहरात ९ मे रोजी घडली. आरोपी बांधकाम पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. तर २४ वर्षीय पीडिता आपल्या पतीसोबत एका गोडाऊनमध्ये राहत होती. तिचा पती एका महाविद्यालयामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. त्यामुळे पीडिता घरी एकटीच असायची. हीच संधी साधून आरोपीने गोडाऊनमध्ये घुसून पीडितेला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर त्याने अत्याचार केला. त्यानंतर आपण केलेले कृत्य उघडकीस येईल, या भीतीने एका तासाच्या अंतराने त्याने पीडितेची हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, त्याने पीडितेच्या शरीराचेही लचके तोडले.
याबाबत चौतुप्पल शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त उदय रेड्डी यांनी सांगितले की, आरोपीने महिलेच्या डोक्यावर बोथट वस्तूने वार करून तिची हत्या केली असावी. आणि त्यानंतर तिच्या मृतदेहावर वारंवार बलात्कार केला. आणि पीडितेचे सोन्याचे दागिने चोरून घटनास्थळावरून पसारा झाला. पीडितेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील लोकांशी बोलून आरोपीची ओळख पटवली. घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मलकापूर गावातून बुधवारी (दि.११) नराधमाला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडील चोरीचे दागिने जप्त केले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?