पुढारी ऑनलाईन डेस्क
छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका 'मुलगी झाली हो' मधून कलाकार किरण माने (विलास पाटील) यांना मालिकेतून काढल्यानंतर मोठं वादळ निर्माण झाले आहे. अनेक कलाकारांनी किरण माने यांना पाठिंबा दिला असला तरी काही महिला सहकलाकारांनी त्यांच्यावर आरोपही केले आहेत. या आरोपांनंतर आता या वादावर मुलगी झाली हो ची मुख्य अभिनेत्री साजिरी अर्थाचं दिव्या पुगांवकर हिने मौन सोडले आहे. दिव्या पुगांवकर (साजिरी) हिने किरण माने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एका मराठी वाहिनीने किरण मानेंना मालिकेतून का काढून टाकलं, याची चर्चा होत असताना काही कलाकारांनी किरण माने यांना समर्थन दिलं. तर काही महिला कलाकारांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैर्या झाडल्या. किरण माने यांच्यावर टीका होत असताना आता या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणारी साजिरी (माऊ) म्हणजेच दिव्याने मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. मालिकेच्या सेटवर माने किती असभ्य वागतात, याविषयीचा खुलासा दिव्याने केला आहे.
दिव्याने मानेंवर गंभीर आरोप करत म्हटलं आहे, "किरण माने आणि माझं बोलणं व्हायचंच नाही. सुरुवातीला जेव्हा मी या मालिकेच्या सेटवर आले त्यावेळी किरण माने मला भेटले. या मालिकेत मी तुझ्या वडिलांची भूमिका करतोय. तर, आपण सेटवरही तसंच राहुयात. मला तुझ्यात माझी मुलगी दिसते, असं ते म्हणाले. सुरुवातीचे काही दिवस छान गेले; पण नंतर ते मला सतत वेगवेगळ्या गोष्टींवरुन टोमणे मारायला लागले".
दिव्या म्हणाली, अनेकदा त्यांनी माझ्या वजनावरुन टोमणे मारले आहेत. इतकंच नाही तर अपशब्ददेखील उच्चारले आहेत. त्यामुळे आता त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्हाला माझ्यात तुमची मुलगी दिसते, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापाने सांगावं की कोणता बाप आपल्या लेकीसाठी असे अपशब्द उच्चारेल? मला त्यांच्याकडून उत्तर हवंय. मालिकेचं चित्रीकरण थांबणार नाही. त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी अनेकदा समजही देण्यात आली होती.
अलिकडेच किरण माने यांनी राजकीय भूमिका घेत सोशल मीडियावर त्यांचं मत मांडलं होतं. त्यांनी राजकीय़ भूमिका मांडल्याने त्यांना मालिकेतून काढल्याचं सांगण्यात आलं. नंतर महिला सहकलाकारांशी असभ्य वर्तन आणि नंतर व्यवसायिक कारणामुळे त्यांना काढल्याचं म्हटलं गेलं. पण, माने यांनी त्यांच्या अधकृत फेसबूकर पेजवर पोस्ट लिहित या आरोपांचं खंडन केलं होतं. माझ्याविरोधात हा कट रचला गेल्याचे माने यांनी म्हटलंय.
हेही वाचलं का?