पुढारी ऑनलाईन डेस्क : सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी भावूक झाला होता. चेन्नईतील प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाने भारावून गेलेल्या धोनीने "दुसरं काय सांगू.. मी खूप काही बोललो.. हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आहे, असे म्हणत त्याने आयपीएलमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. "येथे खेळणे छान आहे. प्रेक्षकांनी आम्हाला खूप प्रेम दिले. दोन वर्षांनंतर येथील प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळाली असून त्यांच्यासमोर खेळणे हे विशेष आहे," असेही तो म्हणाला.
फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाचे २२ धावांत ३ बळी, तसेच सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेच्या नाबाद ७७ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा ७ विकेटस् व ८ चेंडू राखून धडाकेबाज विजय प्राप्त केला. सुरुवातीला, सनरायजर्स हैदराबादला २० षटकांत ७ बाद १३४ धावांवर रोखल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने १८.४ षटकांत ३ बाद १३८ धावांसह दमदार विजय संपादन केला.
विजयानंतर बोलताना महेंद्रसिंह धोनी काहीसा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तो म्हणाला की, "फलंदाजीची फारशी संधी मिळत नाही पण कोणतीही तक्रार नाही. प्रथम क्षेत्ररक्षण घेतल्याने सुरूवातीला संकोच वाटत होता, कारण मला वाटले जास्त दव पडणार नाही. पण आमच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली आणि वेगवान गोलंदाजांनी विशेषत: पाथिरानानेही चांगली गोलंदाजी केली."
दरम्यान, सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले. तो म्हणाला, "पराभव होणे कधी चांगले वाटत नसते, पण फलंदाजांनी निराश केले. आम्ही चांगली भागीदारी करू शकलो नाही. एवढ्या विकेटवर १३० ही चांगली धावसंख्या नव्हती. आम्हाला १६० धावा करायला हव्या होत्या.
हेही वाचा :