MI vs PBKS : यजमान मुंबई इंडियन्सचे पंजाबसमोर कडवे आव्हान

MI vs PBKS : यजमान मुंबई इंडियन्सचे पंजाबसमोर कडवे आव्हान
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : प्रत्येक आयपीएल स्पर्धेतील स्लो स्टार्टर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई इंडियन्सला आता बर्‍यापैकी सूर सापडला असून, उद्या (दि. २२) घरच्या मैदानात पंजाब किंग्जचा धुव्वा उडवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मुंबईचा संघ शुक्रवारच्या सामन्यापूर्वी गुणतालिकेत सहाव्या स्थानी होता. साखळी फेरीअखेर पहिल्या चारमध्ये स्थान संपादन करण्यासाठी त्यांना साहजिकच सर्वस्व पणाला लावावे लागेल. (MI vs PBKS)

पहिल्या दोन सामन्यांत दारुण पराभव पत्करल्यानंतर मुंबईने दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स व सनरायजर्स हैदराबाद यांना धूळ चारली आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी असून, त्यांचा नियमित कर्णधार शिखर धवन या लढतीतही खेळण्याची शक्यता कमी आहे. (MI vs PBKS)

धवनने यंदा पंजाबला पहिल्या टप्प्यात अतिशय आश्वासक सुरुवात करून दिली; पण त्याच्या गैरहजेरीत संघाची कामगिरी खालावली असून, धवनला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेव्हर गोन्साल्विज यांनी सांगितले. पंजाबने 6 सामन्यांत 3 विजय नोंदवले. मात्र, शेवटच्या 4 सामन्यांत 3 पराभव पत्करावे लागले, ही त्यांच्यासाठी मुख्य चिंता ठरत आली आहे. या संघाचा भक्कम आधारस्तंभ असणार्‍या धवनने 4 सामन्यांत 233 धावांची आतषबाजी केली असून, तो संघातून बाहेर गेल्यानंतर त्यांना उतरती कळा लागली आहे.

गोलंदाजीत पंजाबची कामगिरी संमिश्र स्वरूपाची राहिली असून, मुंबईच्या फलंदाजांना रोखणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा व इशान किशन यांनी दमदार सलामी देण्यात सातत्य राखले असून, षटकामागे 10 धावा इतकी त्यांची किमान सरासरी राहिली आहे. कॅमेरून ग्रीन व टीम डेव्हिड यांनी फलंदाजीत मागील 3 सामन्यांत उत्तम कामगिरी साकारली आहे. मात्र, मध्यफळीतील आधारस्तंभ सूर्यकुमार यादवची कामगिरी कशी होईल, यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील. गोलंदाजीच्या आघाडीवर मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरशिवाय उतरावे लागेल, अशी शक्यता आहे. आरसीबीविरुद्ध 2 एप्रिल रोजी झालेल्या लढतीनंतर आर्चर एकदाही खेळलेला नाही. मात्र, संघासमवेत काही काळ त्याने हलका सराव केला आहे.

युवा अर्जुन तेंडुलकरने आपल्या आयपीएल कारकिर्दीला दमदार सुरुवात केली असून, हैदराबादविरुद्ध शेवटच्या षटकात 20 धावांचे संरक्षण करताना त्याने पहिली-वहिली विकेट देखील घेतली. साहजिकच, या डावखुर्‍या सीमरचे मनोबल निश्चितपणाने उंचावलेले असणार आहे.

हेही वाचा; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news