Shreyas Iyer : आयपीएल सुरू असताना श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया! पण…
पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा (IPL) 16 हंगाम सुरू असतानाच टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरबाबत (shreyas iyer) मोठी अपडेट समोर आली आहे. अय्यरच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलमध्ये खेळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
अय्यर (Shreyas Iyer) गेल्या अनेक काळापासून पाठीच्या दुखापतीला झुंज देत होता. मीडिया रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यरवर लंडनमध्ये मंगळवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे श्रेयसला जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमधून बाहेर पडावे लागले आहे. तो जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आयपीएल 2023 पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका पार पडली होती. हा कसोटी सामना सुरू असताना अय्यरने (Shreyas Iyer) पाठीच्या खालच्या भागात सूज आल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी येऊ शकला नव्हता. त्याचबरोबर या दुखापतीमुळे श्रेयस आयपीएलमध्येही सहभागी होता आलेले नाही.