CSK vs SRH : चेन्नईचा हैदराबादवर सात गडी राखून विजय | पुढारी

CSK vs SRH : चेन्नईचा हैदराबादवर सात गडी राखून विजय

चेन्नई; वृत्तसंस्था : फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाचे 22 धावांत 3 बळी, तसेच सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेच्या नाबाद 77 धावांच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 7 विकेटस् व 8 चेंडूंचा खेळ बाकी राखत धडाकेबाज विजय प्राप्त केला. प्रारंभी, सनरायजर्स हैदराबादला 20 षटकांत 7 बाद 134 धावांवर रोखण्याचा पराक्रम गाजवल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 18.4 षटकांत 3 बाद 138 धावांसह दमदार विजय संपादन केला. (CSK vs SRH)

विजयासाठी 135 धावांचे तुलनेने माफक आव्हान असताना ऋतुराज गायकवाडने 30 चेंडूत 35, तर डेव्हॉन कॉन्वेने 57 चेंडूत नाबाद 77 धावांची आतषबाजी करत या सामन्याला एकतर्फी स्वरूप दिले. कॉन्वेच्या 77 धावांच्या खेळीत तब्बल 12 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. या जोडीने 11 षटकांत 87 धावांची सलामी दिली, त्याचवेळी चेन्नईचा विजय सुनिश्चित झाला होता.

ऋतुराज गायकवाड 35 धावांवर धावचित झाला तर अजिंक्य रहाणे व अंबाती रायडू प्रत्येकी 9 धावांवर बाद झाले. मात्र, तोवर चेन्नईचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. शेवटी कॉन्वेने 6 धावांवर नाबाद राहिलेल्या मोईन अलीसह विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. हैदराबादतर्फे मयंक मार्कंडेयने 23 धावांत 2 बळी घेतले.

संबंधित बातम्या

तत्पूर्वी, फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाने 22 धावांत 3 बळी घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने सनरायजर्स हैदराबादला निर्धारित 20 षटकांत 7 बाद 134 धावांवर रोखले. सनरायजर्सतर्फे अभिषेक शर्माने 26 चेंडूंत 3 चौकार, 1 षटकारासह सर्वाधिक 34 धावांचे योगदान दिले. तिसर्‍या स्थानावरील राहुल त्रिपाठीने 21 धावा केल्या. त्या तुलनेत अन्य फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कल्पक नेतृत्व व चपळ क्षेत्ररक्षण या लढतीतही प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणणारे ठरले. त्याने गोलंदाजीत केलेले बदलदेखील संघाच्या पथ्यावर पडले. चेन्नईने नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबादला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. रवींद्र जडेजाने हा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवला. त्याने अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी व मयंक अगरवालला तंबूचा रस्ता दाखवला.

हैदराबादतर्फे हॅरी ब्रूक (18) व अभिषेक शर्मा (34) यांनी 4.2 षटकांत 35 धावांची सलामी दिली. आकाश सिंगने पाचव्या षटकात हॅरी ब्रूकला बॅकवर्ड पॉईंटवरील गायकवाडकरवी झेलबाद केले. त्यानंतर 10 व्या षटकात जडेजाने अभिषेक शर्माला बाद करत चेन्नईच्या मार्गातील अडथळा दूर सारला. अभिषेकचा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर लाँग ऑनवरील रहाणेने सोपा झेल टिपला.

हेही वाचा;

Back to top button